आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअपघाताची मालिका सुरूच असल्याने खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी मंगळवारी (३ मे) सकाळी ११ वाजता महामार्गाच्या अधिकाऱ्यांसोबत अंबाजोगाई-लातूर मार्गावरील अपघातप्रवण ठिकाणांची पाहणी केली. या वेळी खा. मुंडेंनी या रस्त्यावर तातडीने गतिरोधक, वाहतूक सूचनांचे फलके लावावीत, मार्गाच्या चौपदरीकरणासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने राज्य शासनाकडे तत्काळ प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना महामार्गाचे कार्यकारी अभियंत्यांना दिल्या. या भेटीनंतर कंत्राटदाराला बोलावून तातडीने काम सुरू करण्याचे सांगितले. परंतु, दुर्देवाने याच मार्गावर अंबाजोगाईहून खाद्यतेल घेऊन लातूरला जाणाऱ्या टँकरने सेलुअंबा टोलनाक्याजवळ सायंकाळी पाच वाजता लातूरच्या दाम्पत्याच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात पती जखमी, तर पत्नी ठार झाल्याची घटना घडली. अंबाजोगाई-लातूर महामार्गावर दोन वर्षातील मंगळवारचा ५८ बळी ठरला आहे.
लातूरहून अंबाजोगाईकडे येणारा राष्ट्रीय महामार्ग बर्दापूरपासून पुढे दोन पदरी होताे. आतापर्यंत ५७ बळी गेलेले असताना हे अपघातप्रवण क्षेत्र ओळखून येथे चिन्हित केलेले नसल्याने खासदार मुंडेंनी अभियंत्यांना खडसावत अपघात रोखण्यासाठी दोन अपघात प्रवण क्षेत्राच्या दोन्ही बाजूनी आठवडाभरात सूचना फलके, गतिरोधक बसवण्याची अधिकाऱ्यांना तंबी दिली. या मार्गाच्या चौपदरीकरणासाठी संबंधित विभागांनी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केल्यावर हा प्रश्न तत्काळ मार्गी लावू असेही खासदार मुंडेंनी सांगितले. या वेळी त्यांच्यासमवेत अक्षय मुंदडा, प्रवक्ते राम कुलकर्णी, भाजपचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे, गणेश कराड, कमलाकर कोपले, दिलीप काळे आदी उपस्थित होते.
मंगळवारी सायंकाळी ५८ वा बळी
अंबाजोगाईहून खाद्यतेल घेऊन लातूरकडे जाणाऱ्या टँकरने (एमएच १३ वाय १५५) सेलूआंबा टोल नाक्याजवळ मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास दाम्पत्याच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यात दुचाकीस्वार पती विशाल ढगे (वय २६) हे किरकोळ जखमी, तर पाठीमागे बसलेली त्यांची पत्नी कोमल ढगे (२१, रा. मांझरी जि. लातूर) ही दुचाकीवरून खाली पडली आणि टँकरचे चाक तिच्या डोक्यावरून गेल्याने जागीच ठार झाली. वाघाळा येथून हे पती-पत्नी उपचार करून परत ते लातूरला जात होते. दरम्यान, हा अपघात घडला. लातूर-अंबाजोगाई महामार्गावर २ वर्षातील मंगळवारचा हा ५८ वा बळी गेला.
खासदार प्रीतम मुंडेंची थेट गडकरींशी चर्चा
बर्दापूर ते वाघाळा चौपदरीकरणासाठी खासदार प्रीतम मुंडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला. चौपदरीकरणाचा प्रस्ताव दाखल करा, आवश्यक प्रक्रिया पूर्ण होताच प्रश्न मार्गी लावू व दिल्लीत आल्यावर अधिक चर्चा करू, असे गडकरींनी खासदार मुंडेंना सांगितले.
दररोज १० हजारांपेक्षा जास्त वाहने धावतात
तेलंगण, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांत जाण्यासाठी लातूर ते अंबासाखर महामार्गाचा वापर होतो. या मार्गावर रोज १० हजारांपेक्षा जास्त वाहने धावतात. चारपदरी महामार्गासाठी दहा हजार वाहनांची प्रतिदिन वाहतूक असावी असे मानक आहे. ही पात्रता पूर्ण होत आहे. बर्दापूर ते वाघाळा मार्ग अद्याप दुपदरीच आहे. त्यामुळे प्रस्ताव दाखल केल्यास चौपदरीकरणाला तत्काळ मान्यता मिळेल.
-जी. पी. स्वामी, कार्यकारी अभियंता, महामार्ग
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.