आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ला घेण्याच्या सूचना; सोयाबीनचे क्षेत्र वाढणार

बीड17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील अंबाजोगाई, केज आणि परळी या तीन तालुक्यांमधील शेतकऱ्यांचे सोयाबीन हे मुख्य पीक आहे. उर्वरित बीड, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, गेवराई, माजलगाव, धारूर, वडवणी या तालुक्यांमध्ये कपाशीची लागवड शेतकरी माेठ्या प्रमाणात करतात. यंदा काही तालुक्यांत पाऊस झाल्याने पेरणीची कामे सुरू झालीत, तर गेवराई व परळी तालुक्यात कपाशीची लागवड झालेली आहे. मात्र, काही तालुक्यांत कापसासाठी पावसाची शेतकरी प्रतीक्षा करत आहेत.

पाऊस लांबणीवर जात असल्याने कपाशीची लागवड करावी की नाही, अशा चिंतेत शेतकरी असून वेळीच पाऊस झाला नाही तर सोयाबीन हा पर्याय असू शकेल, अशी चर्चा शेतकऱ्यांतून होत आहे. जिल्ह्यात मागील वर्षी २ लाख ६४ हजार ७१ हेक्टरांवर कपाशीचे लागवड झाली होती, तर ३ लाख १५ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला होता. यंदा गेवराई तालुक्यात १६ जूनपर्यंत १ हजार ८४७ हेक्टरांवर व परळी तालुक्यात २५ हेक्टरांवर कपाशीची लागवड झालेली आहे. ज्या भागात बागायती क्षेत्र आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीची कामे सुरू केलीत.

जोरदार पाऊस होऊन आठ-दहा दिवसांत वाफसा झाला तर कपाशीची लागवड होईल, अन्य‌था सोयाबीन हा पर्याय असेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र जोपर्यंत ६५ मिमी पाऊस होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांना अडचणी जाणवतील, त्यांनी कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घ्यावे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जेजुरकर यांनी कळवले.

शेतकऱ्यांनी पावसाची प्रतीक्षा करावी
जिल्ह्यात यंदा कपाशी आणि सोयाबीनच्या पेऱ्याचे क्षेत्र वाढेल, असा अंदाज आहे. अद्याप जिल्ह्यात सर्वदूर पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. जिल्ह्यात सरासरी पेरणीचा हंगाम २१ जूनपासून पुढे सुरू होतो. १५ जुलैपर्यंत शेतकरी पेरणीची कामे पूर्ण करतात. सरासरी एखादा टक्का पेरणी झाली असेल असा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार पेरणीची कामे करावीत.
- बी. के. जेजुरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

पावसावरच कपाशी की सोयाबीन याची निवड
मागील वर्षी कापसाला ९५०० ते १० हजार रुपयांचा भाव मिळाला होता. त्यामुळे यंदा कपाशीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. बीड-गेवराई तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी मागील वर्षीचा अंदाज घेऊन या वर्षीचे नियोजन केले आहे. परंतु, पाऊस लांबणीवर जात असल्याने चिंता वाढू लागली. चार-पाच दिवसांत जोरदार पाऊस झाल्यास कपाशी लागवड होईल, अन्यथा अनेक शेतकरी सोयाबीन पेरणी करण्याकडे वळतील.
-अजय घोडके, शेतकरी, लोळदगाव.

बातम्या आणखी आहेत...