आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अध्यात्म:प्रपंचात आत्मिक सुख-शांतीसाठी परमार्थाची वाट चालणे आवश्यक; बीड येथे त्रिविक्रमानंद शास्त्री यांचे प्रतिपादन

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रपंचात माणसे नुसती वणवण करतात. भोग भोगूनही शांत होत नाहीत, त्यांची वासना मरत नाही. त्यामुळे त्यांना पुन:पुन्हा जन्माला यावे लागते. पण परमार्थ महाधन आहे. जीवाने आपल्या इंद्रियांना आवरून परमार्थाकडे लावल्यास तो सुखरूप असलेला सुखच देईल. तिथे शांतीचा स्पर्श आहे म्हणूनच परमार्थ हे समृद्ध सुख आहे. हे कायम लक्षात ठेवावे, असे प्रतिपादन त्रिविक्रमानंदशास्त्री यांनी केले.

बीड येथील श्रीसंत भगवान बाबा, संत वामन भाऊ प्रतिष्ठान येथे मुर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या १० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनात ते बोलत होते. ‘चला वळू गायी, बैसू जेऊ एके ठायीं’ या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगावर त्रिविक्रमानंद शास्त्री निरूपण केले. त्रिविक्रमानंद शास्त्री म्हणाले की, शरीर चालविण्यासाठी इंद्रिये लागतात त्यास संत तुकाराम महाराजांनी गायी म्हटले आहे. आपण इंद्रियाच्या आश्रयाने राहतो. इंद्रियांचा स्वभाव विषय सेवन आहे. विषय सेवनाने कोणी तृप्त झाला नाही त्यातच तो शांत न होता त्यास शीण येतो. शरीर व त्यासंबंधी पसाऱ्यात फिरत राहणे यासच वणवण म्हणतात. यात केवळ दु:ख आहे पण अपेक्षा मात्र सुखाची केली जाते. खरे सुख घ्यायचे असेल तर इंद्रिये संयमित असून त्यांस परमार्थाचा आग्रह हवा आहे, असेही त्यांनी सांगितले. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, वारकरी संप्रदाय हा समाज प्रबोधनाचे प्रभावी माध्यम असून संप्रदायाने आपली पताका अटकेपार नेली आहे.

हे प्रतिष्ठानही अध्यात्मिक कार्य जोमाने करत आहे. संतांनी समाज जीवनास योग्य दिशांनी वाटचाल करण्याचे ज्ञान दिलेले आहे. यापुढेही वैष्णवधर्माची ही पताका अशीच फडकत राहावी. यातून समाजाला दिशा मिळत राहावी. जोपर्यंत समाजात संत, महंत व सद‌्विचारांचे प्रेरक आहेत, तोपर्यंत समाजाचे संतुलन कायम राहील, असेही माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी सांगितले. यावेळी सुशिला मोराळे, अरूण डाके, अशोक जाधव, अंगद महाराज मोरे, रामहरी रसाळ गुरूजी, अनंत घिगे, चंपावती पानसंबळ, सुहास पाटील, ॲड.महेश गर्जे, डॉ.श्रीहरी लहाने, मधुकर ढाकणे, नारायण नागरे, डॉ.तांबडे, धनंजय सानप, प्रवीण सानप, कुंडलिक खेडकर, ॲड.संतोष वारे, पुष्पा पांगारकर, सुमित्रा खेडकर, दादाहरी गीते, अरूण बावणे महाराज, राजेंद्र सानप, नागरगोजे आदींची उपस्थिती होती. उपस्थितांचे आभार संयोजन मंडळाच्या वतीने राजेंद्र सानप यांनी मानले. यप्रसंगी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.

षड‌्रिपूंपासून दूर राहण्यास नामसंकीर्तनावर भर द्यावा
माणसाचा स्वभाव शांत असेल तर त्यातून विश्वशांती साधली जाते. काम, क्रोधादी षडरिपूंपासून दूर राहणे आवश्यक आहे. जो व्यक्ती ध्यान साधना करेल, ईश्वराची आराधना करेल, तो निश्चितपणे पारमार्थिक प्रगती साधेल. त्यामुळे नामसंकीर्तनावर आपण भर दिला पाहिजे. हीच अध्यात्मिक जीवनातील यशाची प्राप्ती आहे, असे याप्रसंगी त्रिविक्रमानंद शास्त्री यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...