आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कीर्तन:परमात्म्याच्या स्वरूपात विलीन होता येणे हीच सर्वोपयोगी; पुण्यतिथी सोहळ्यात संदिपान महाराज हसेगावकर यांचे प्रतिपादन

बीड19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परमात्म्याच्या स्वरूपात विलीन होता येणे हीच आपल्या सर्वांसाठी सर्वोपयोगी अशी सिध्दी आहे. त्यामुळे नामस्मरणात विलीन होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने वेळ काढणे अतिशय गरजेचे आहे, असे प्रतिपादन संदिपान महाराज हसेगांवकर यांनी केले. बीड तालुक्यातील श्रीक्षेत्र चाकरवाडी येथे सदगुरु श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या २२ व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित सप्ताहात हसेगांवकर महाराज यांनी कीर्तन पुष्प गुंफले.‘काम क्रोध आम्ही वाहिले, विठ्ठली आवडी धरिली पायासवे या संत तुकाराम महाराज यांच्या चार चरणी अभंगातून ज्ञानसिंधू संदीपान महाराज हसेगांवकर यांनी अंतरंग जीवनाचा परिचय सांगितला. पुढे बोलताना संदिपान महाराज हसेगांवकर म्हणाले की, जो तो आपल्या कर्मात श्रेष्ठ आहे.

दोष असला तरी आपले कर्म टाकू नये‌.सावता महाराजांनी शेती हे कर्म सदोष असले तरी टाकून दिले नाही. ते काम करतच राहिले. परमात्म्याला प्रसन्न करण्यासाठी त्यास वाहिलेले परत घेऊन त्याचा वापर केल्यास दोष लागतो. संत म्हणतात आम्ही आतील काम क्रोध देवास वाहिले.या काम, क्रोधाने आपले जीवन उद्ध्वस्त केले आहे. ‘कामाचेनि घाये, ब्रम्हा लेकीधरू जाय’ म्हणजेच क्रोध हा जीवनातील विचार नाहीसा करतो.जगात कोणतीही गोष्ट वाईट नाही तिचा वापर करण्यावर आहे. वारीस गेलो तर वस्तू खरेदीवर भर न देता कीर्तन, प्रवचन, दर्शन यावर भर द्यावा.

संतांनी कामक्रोध विकार वाईट आहेत हे सांगितलेच आहे. पण ते चांगल्या करिता देवास वाहिले. इच्छाही देवास वाहिली.परमार्थात माणसाने स्वभाव सुधारित जावा. त्याने देवाजवळ जाता येते.देवाच्या चरणाची आवड धरावी. त्यामुळे प्रपंचातील विषयाकडे आकर्षित होणार नाहीत, असेही संदीपान हसेगांवकर महाराज यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.

भक्तीपंथाशी जाऊन आपले कल्याण करून घ्यावे
स्वर्ग, वैकुंठ ओलांडून आपल्या स्वरुपात विलीन होऊन सर्व सुखाचा आगरू येथे आलो आहोत. ‘हाचि नेम आता न फिरे माघारी’ याचा अर्थ श्रेष्ठ अवस्था प्राप्त झाली आहे. देहभाव, ब्रम्हभाव यातून बाहेर पडून प्रेमभावात विलिन झालो आहोत. ही अवस्था संत माऊलींनी मिळवून जगासाठी हा भक्तीपंथ खुला केला आहे. सर्वांनी येऊन सिध्दी प्राप्त करून घ्यावी व कल्याण करुन घ्यावे, असे हसेगांवकर महाराज यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...