आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील बारभाई तांडा येथील भारत रामराव राठोड या भारतीय सैन्य दलातील जवानाचे उपचारादरम्यान रविवारी निधन झाले. सोमवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस दलाकडून या वेळी मानवंदना दिली गेली.
माजलगाव तालुक्यातील बारभाई तांडा येथील भारत राठोड (२९) हे २०१२ मध्ये भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. सुरुवातीचे प्रशिक्षण नागपूर येथे घेतल्यानंतर त्यांची नियुक्ती जम्मू-काश्मीर येथे झाली होती. कर्तव्यावर असताना काही दिवसांपूर्वी राठोड हे आजारी पडले. त्यांना उपचारासाठी पुण्यात दाखल केले होते. उपचारादरम्यान रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. पुण्यात भारतीय सैन्यदलाने त्यांच्या पार्थिवाला मानवंदना देत व पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांचे पार्थिव सोमवारी मूळ गावी आणले गेले.
बारभाई तांडा येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केेले गेले. या वेळी प्रशिक्षणार्थी सहायक पोलिस अधीक्षक रश्मिथा राव यांनी मानवंदना देत पार्थिवावरील तिरंगा ध्वज राठोड कुटुंबीयांच्या स्वाधीन केला. पोलिस निरीक्षकांसह इतर उपस्थित पोलिसांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. त्यानंतर अंत्यसंस्कार केले गेले.
या वेळी शहीद जवान अमर रहे, भारत राठोड अमर रहे अशा घोषणा गावकऱ्यांनी दिल्या. अंत्यसंस्कारासाठी बारभाई तांडा व माजलगाव तालुक्यातून नागरिकांनी गर्दी केली होती. राठोड यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व दोन मुली असा परिवार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.