आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील दोन वर्ष कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन परिस्थितीत दोन वर्षे खंड पडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या वर्षी मोठ्या थाटामाटात साजरी करण्यास सरकारने परवानगी दिल्यानंतर बीड शहरामध्ये सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची भव्य तयारी करण्यात आली आहे. या जयंती निमित्ताने १ एप्रिलपासून १४ एप्रिलपर्यंत विविध सामाजिक उपक्रमासह भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमाचा सर्व आंबेडकरप्रेमी नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
या लॉकडाउन परिस्थितीत सर्व सण उत्सव घरातच राहुन साजरे करावे लागले. आंबेडकर प्रेमी नागरिकांनी सलग दोन वर्षे घरांमधून डॉ बाबासाहेब आंबेडकरांना घरी राहून अभिवादन करून जयंती साजरी केली. या वर्षी मागील काही दिवसापासून कोरोना महामारी कमी होऊ लागल्याने शासनाने हळूहळू सर्व निर्बंध कमी केले. एक एप्रिल पासून राज्याला कोरोना निर्बंधमुक्त केल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषीत केले. या वेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यास परवानगी दिली. त्यानंतर बीड शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याची जय्यत तयारी बीड शहर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आली.
या मध्ये १ एप्रिल २०२२ पासून १४ एप्रिल २०२२ पर्यंत विविध सामाजिक उपक्रमासह भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शुक्रवार दि.१ ते मंगळवार दि. १२ एप्रिल या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा स्टेडियमवर भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सायं. ६ ते १० या वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन येथे भिक्खु ग्यानरक्षीत थेरो पी.एच.डी. पालि अॅन्ड बुद्धिझम यांचा धम्मदेसना कार्यक्रम होणार आहे. बुधवारी सायं. ६ ते १० एकांकिका रुपेशजी निकाळजे लिखित क्रांतीचा साक्षीदार एकपात्री नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवारी सकाळी ११ ते सायं. १० भिमगीत गायन स्पर्धा, शुक्रवारी सकाळी ११ ते सायं. ५ संगीतखुर्ची, रांगोळी व इतर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सायं. ६ ते १० प्रा. डॉ. नेत्रपालसिंग (दिल्ली) यांचे आंबेडकरी चळवळीतील कर्मचाऱ्यांची जबाबदारी आणि वर्तमानातील भुमिका या विषयावर व्याख्यान, रविवारी सकाळी ११ ते ५ वेळेत ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी महापुरुष या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तर याचं दिवशी सायं. ६ ते १० या वेळेत प्रा. डॉ. ऋषीकेश कांबळे यांचे भारतीय लोकशाहीचे भवितव्य या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
सोमवारी सकाळी ९ ते १० या वेळेत सारडा कॅपिटल समोर स्टेडियम जवळ डि.पी. रोड येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले अभिवादन करण्यात येणार आहे. त्या नंतर सकाळी १० ते ५ या वेळेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अमोल गिते यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबीर व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.