आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड:करुणा शर्मा यांनी न्यायालयामध्ये स्वत:च मांडली बाजू, वकील अनुपस्थित असल्याने अंबाजोगाई न्यायालयात म्हणाल्या, राजकीय दबावातून खोटा गुन्हा

बीड/अंबाजोगाई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिवे मारण्याचा प्रयत्न व ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा नोंद झाल्याने अटकेत असलेल्या करुणा शर्मा यांना अंबाजोगाई न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. तर अरुण मोरेला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली गेली. दरम्यान, सरकारी पक्षाने करुणा यांच्या पाच दिवसांच्या कोठडीची मागणी केली. न्यायालयात करुणा यांचे वकील उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे करुणा यांनीच स्वत: युक्तिवाद करून आपली बाजू मांडली.

धनंजय मुंडे समर्थकांना खुले आव्हान देत त्या रविवारी थेट परळीत दाखल झाल्या होत्या. दरम्यान, वैद्यनाथ मंदिराजवळ त्यांना काही महिलांनी अडवले यानंतर त्यांच्यात व महिलांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यानंतर त्यांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तिथे वाहनात पिस्टल आढळले होते. दरम्यान, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या तालुका संयोगिनी विशाखा घाडगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून करुणा शर्मा व अरुण मोरे विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

कोर्ट रूम लाइव्ह....
सरकारी पक्ष : पाच दिवसांची कोठडी द्या

गुन्ह्यातील चाकू जप्त करणे, तो चाकू कुठून आणला याचा तपास करणे, मोबाइल, लॅपटॉप जप्त करून आरोपींच्या संपर्कात कोण होते याची माहिती घेणे, गुन्ह्यासाठी कुणी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत केली याचा तपास करणे, वाहनात पिस्टल आढळून आले असून त्या आरोपींसोबत करुणा यांचे काय लागेेबांधे आहेत याचा तपास करणे, मुंबईत जाऊन आरोपींची घर झडती घेणे व हा गुन्हा गंभीर असल्याने पाच दिवसांची पोलिस काेठडी द्यावी.

करुणा शर्मा : गुन्हा राजकीय दबावातून
मी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना पत्र देऊन परळीत आले होते. श्रावण महिना असल्याने मला वैद्यनाथाचे दर्शन घ्यायचे होते. माझ्यावर जो अन्याय झाला त्याबाबत मला पत्रकारांशी वार्तालाप करायचा होता. मी मुंबईची राहणारी आहे. समोरची महिला कुठल्या जातीची आहे हे मला कसे माहिती असणार. राजकीय दबावातून माझ्यावर खोटा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

न्यायालय : करुणांना एमसीआर, मोरेला पीसीआर
या प्रकरणात दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने करुणा शर्मा यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. तर, अरुण मोरेला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली गेली.

हे प्रश्न अद्याप अनुत्तरित
- शर्मांच्या येण्याने कुणाच्या जिवाला धोका असेल तर त्यांना अडवले का नाही?
- शहरात प्रवेश करतानाच त्यांच्या वाहनाची तपासणी का केली नाही?
- ठाण्यात गेल्यावरच वाहन तपासणी का?
- कारमध्ये पिस्टल ठेवणारी व्यक्ती कोण?
- पिस्टल ठेवताना आजूबाजूच्या पोलिसांची बघ्याची भूमिका का ?
- पोलिस असतानाही चाकूहल्ला झालाच कसा?

व्हायरल व्हिडिओप्रकरणी चौकशी
एसपी आर. राजा यांनी पत्रकार परिषदे घेऊन माहिती दिली. करुणा यांच्या वाहनात पिस्टल ठेवल्याप्रकरणी व्हायरल व्हिडिओची चौकशी सुरू आहे. करुणा यांना पोलिसांनी नोटीसही बजावली होती. मात्र तरी त्या परळीत आल्या. महिलेच्या तक्रारीवरून व डॉक्टरांच्या प्रमाणपत्रावरून गुन्ह्यातील कलमे लावली गेली असल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...