आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:खरीप हंगाम 2022 ची ई-पीक पाहणीची मोबाइल ॲपद्वारे नोंदणी सुरू

रवी उबाळे | बीड11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील वर्षभराच्या अनुभवावरून व स्थानिक पातळीवरून आलेल्या सूचनांच्या आधारे ई-पीक पाहणी मोबाइल ॲपमध्ये बदल केले आहे. खरीप हंगाम २०२२ ची ई-पीक पाहणी मोबाइल ॲपद्वारे नोंदणी १ ऑगस्ट २०२२ पासून सुरू झाली. शेतकऱ्यांसाठी वापरण्यास अत्यंत सोपे व सुटसुटीत मोबाइल ॲप व्हर्जन-२ विकसित केलेले आहे. हे सुधारित ई-पीक पाहणी मोबाईल ॲप व्हर्जन-२ गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी मोबाइल ॲपद्वारे पीक पाहणी नोंदवल्यापासून ४८ तासांत स्वत:हून केव्हाही एक वेळेस दुरुस्त करता येईल. किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत पिकाच्या विक्रीसाठी संमती नोंदवण्याची सुविधा मिळणार आहे.

राज्य शासनाचा ई-पीक पाहणी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प १५ ऑगस्ट २०२१ पासून संपूर्ण राज्यात राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीला एक वर्ष पूर्ण होत आहे. ई-पीक पाहणी मोबाइल ॲपद्वारे आतापर्यंत सुमारे १ कोटी ११ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यापूर्वीच्या मोबाइल ॲपमध्ये मुख्य पीक व दोन दुय्यम पिके नोंदवण्याची सुविधा उपलब्ध होती. मात्र, क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या मागणीप्रमाणे एक मुख्य पीक व तीन दुय्यम पिके नोंदवण्यावर सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.किमान १०% तपासणी तलाठ्यांमार्फत : शेतकऱ्यांनी केलेल्या पीक पाहणीपैकी १० टक्के नोंदीची पडताळणी तलाठ्यांमार्फत करण्यात आहे.

ई-पीक पाहणी व्हर्जन-२ मधील नवीन सुधारणा
सुधारित ॲपमध्ये प्रत्येक गटाच्या मध्यबिंदूचे अक्षांश व रेखांश समाविष्ट केले आहे. शेतकरी ज्या वेळी पीक पाहणी करताना पिकांचे फोटो घेतील, त्या वेळेस फोटो घेण्याच्या ठिकाणापासून त्या गटाच्या मध्यबिंदूपर्यंतचे अंतर आज्ञावलीत दिसणार आहे. शेतकरी पीक पाहणीसाठी निवडलेल्या गटापासून दूर असल्यास त्यांना त्याबाबतचा संदेश ॲपमध्ये दर्शवण्यात येणार आहे. अचूक फोटो घेतला किंवा नाही हे निर्धारित करता येणार आहे.

शेतकऱ्यांना कशासाठी मिळणार नेमकी मदत
ई-पीक पाहणीच्या नोंदी या पीक विमा व पीक विमा दावे निकाली काढण्यासाठी, पीक कर्ज वाटप, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करण्यासाठी मदत मिळणार आहे.

सर्व गावांसाठी सुविधा
ई-पीक पाहणी मोबाइल ॲपमध्ये त्या गावातील खातेदारांनी पीक पाहणीची माहिती पाहण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्याद्वारे खातेदारांना पीक पाहणीत दुरुस्ती करावयाची असल्यास वेळेत तलाठी यांच्याकडे अर्ज करणे शक्य होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...