आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यशाळा:कुंबेफळला एक दिवस माझ्या बळीराजासाठी कार्यशाळा

अंबाजोगाईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने “एक दिवस माझ्या बळीराजासाठी” हा उपक्रम गुरुवारपासून (ता.१ सप्टेंबर) सुरू करण्यात आला. त्यानिमित्ताने उपविभागीय कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय तंत्रज्ञान समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी कुंबेफळ येथे शेतकऱ्यांची बैठक घेऊन उपस्थित शेतकऱ्यांसोबत उत्पादन खर्च, शेती करताना येणाऱ्या अडचणी संदर्भात विस्तृतपणे चर्चा केली.

या उपक्रमाच्या माध्यमातून प्रामुख्याने मजुरांच्या कमतरतेमुळे तणव्यवस्थापन, फवारणीसाठी, सोयाबीन काढणी वेळेस येणाऱ्या अडचणींवर चर्चा झाली. यासह हवामान बदलामुळे पडणारा अवकाळी पाऊस तसेच पिकाच्या संवेदनशील अवस्थेमध्ये पावसाच्या खंडामुळे होणारे नुकसान बाबी शेतकऱ्यांनी मांडल्या. यावर उपाययोजना म्हणून येळकर यांनी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून त्या माध्यमातून यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेऊन जास्तीत जास्त कामे मजुरांऐवजी यंत्राच्या साह्याने करून घेण्याचे सुचवले. यासह शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, स्मार्ट प्रकल्प, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग यासारख्या योजनांच्या माध्यमातून गावामध्येच प्रक्रिया उद्योग उभारणी करून शाश्वत कृषी मूल्य साखळी उभी करून आपल्या शेतमालाला योग्य भाव पदरात पाडून घेणे, असेही त्यांनी सांगितले.

आद्रकीवर प्रक्रिया करून सुंठ निर्मिती व्यवसाय उभारणे, सोयाबीनच्या नवीन जाती, राजमासारख्या पिकाचे बीजोत्पादन राबवून त्या माध्यमातून आर्थिक सुबत्ता मिळवणे संदर्भात येळकर विस्तृतपणे मार्गदर्शन केले. यासोबत कीडरोगांच्या नियंत्रणाविषयी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना याप्रसंगी उत्तरे देण्यात आली. तसेच अल्प पर्जन्य काळात पिकांची कशी काळजी घ्यावी, या अनुषंगानेही माहिती देण्यात आली.

पोकरा योजना परिवर्तन घडवून आणणारी पोकरा योजना शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणारी आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ पात्र गावातील शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे, असे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले. बीजोत्पादन घटक राबवलेल्या शेतकऱ्यांचे अनुदान मिळण्यासाठी पोकरा डीबीटी अॅप्लिकेशनवर ऑनलाइन अर्ज दाखल करून दिले. प्रशिक्षक दशरथ उबाळेंनी मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...