आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनंजय मुंडेंच्या गणेशोत्सवात अमृता खानविलकरची लावणी:टीकेनंतर मुंडेंचे प्रत्युत्तर, 'नाम है, इसलिए बदनाम कर रहें हो?'

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी परळीतील वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवात अमृता खानविलकरचा लावणी परफॉर्मन्स आयोजित केला होता. मात्र, हा परफॉर्मन्स सादर केल्यानंतर गणेशोत्सव मंडळावर टीका होत आहे. यावर 'हममे नाम है, इसिलीये हमे बदनाम कर रहे हो?' असा शेर सुनावत धनंजय मुंडेंनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे.

17 वर्षांपासून उत्सव

धनंजय मुंडे परळीच्या नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत. सतरा वर्षांपासून वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. यंदा गणेशोत्सवामध्ये लावणी, कव्वाली, भीम गीते आणि हास्य कार्यक्रमांचे मोठे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अमृताच्या लावणीचाही कार्यक्रम होता. पहिल्याच दिवशी लावणी ठेवल्याने लोकांनी सडकून टीका केली. यावर आता धनंजय मुंडे आणि अमृता खानविलकर या दोघांनीही स्पष्टीकरण दिले आहे.

बदनाम करु नका

टीकेनंतर धनंजय मुंडे म्हणाले, या महोत्सवावर अनेकजणांच्या नजरा आहेत. याला बदनाम कस करायच, याचेही प्रयत्न सुरु आहेत. 'हममे नाम है, इसीलीये हमे बदनाम कर रहे हो', असे म्हणत पुढे त्यांनी अजून एक शेर सुनावला. 'अगर मुझे नजर अंदाज करना है तो शिद्दतसे करो, नजर मिल गयी तो अंदाज बदल जायेगे'. सांस्कृतिक कार्यक्रमांवरून विविध सामाजिक कार्यात आणि संकट काळात सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या नाथ प्रतिष्ठान संस्थेला बदनाम करु नका. तुमचा राग माझ्यावर असेल तर व्यक्तिगत माझ्यावर टीका करा.

महाराष्ट्रही बदनाम होतोय

नाथ प्रतिष्ठानने केलेल्या सामाजिक कार्यांबद्दलही धनंजय मुंडेंनी यावेळी माहिती दिली. महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल बोलताना ते म्हणाले, मी हात जोडून विनंती करतो की, आपल्या बोलण्यातून, लिहिण्यातून महाराष्ट्राच्या संस्कृतीला बदनाम करु नका. ही कला, संस्कृती बदनाम होत असेल तर महाराष्ट्रही बदनाम होत आहे. माझ्यावर राग असेल तर धनंजय मुंडेंवर टीका करा.

गालबोट लावू नका - अमृता खानविलकर

गणेशोत्सवातील लावणीबाबत अमृता खानविलकर म्हणाली, लावणी ही आपली ओळख आहे. आज ती जगभरात प्रसिद्ध आहे. तिला वेगळ्या नजरेने, खालच्या नजरेने बघणे पाप आहे. माझी माध्यमांना विनंती आहे की, तुमच्या काही व्ह्यूज मिळवण्यासाठी गालबोट लावू नका. अनेक कलाकार इथे येऊन आपली कला सादर करतात. लावणी ही शृंगारीक असली तरी आध्यात्मिक आहे. कलाकार म्हणून त्यांनी ट्रोलर्सला विनंती केली की, एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आजकाल कोणी आयोजित करत नाही. त्यामुळे त्याला गालबोट लावू नका.

बातम्या आणखी आहेत...