आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:​​​​​​​लावणी ही मराठी मनाची अस्मिता, तिला मान मिळावा; अभिनेत्री कावेरी पुणेकरांनी व्यक्त केल्या भावना

महेश बेदरे | पाटोदा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लावणीचा मूळ उगमच मराठी मातीतील आहे. त्यामुळे लावणी ही कला नक्कीच मराठी मनाची अस्मिता आहे. मात्र अजूनही लावणी विषयी गैरसमज व कलाकारांविषयी देखील चुकीच्या समजुती आहेत. लावणी ही मराठमोळी कला, संस्कृ़ती आहे, तिचा सन्मान व्हावा व कलावंतांकडे बघण्याची मानसिकता बदलण्याची गरज आहे, अशी भावना लावणी कलाकार व अभिनेत्री कावेरी पुणेकर घंगाळे यांनी व्यक्त केले. गणेशोत्सवाचे औचित्य साधून पाटोदा नगरपंचायतच्या वतीने शहरात कावेरी गंगावे व सुप्रिया पुणेकर यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पुणेकर यांनी लावणी कलावंतांपुढील आव्हानांचा पट उलगडला.

त्या म्हणाल्या, आपण सर्वसाधारण कुटुंबातील असून लहान असतानाच आई-वडीलांचे छत्र हरपले. स्वतःसह दोन बहिणींचा सांभाळ करत बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. शाळेत असल्यापासूनच कलेची आवड होती नाटक तसेच गाण्यांच्या कार्यक्रमात नेहमीच सहभाग घेत. याचं क्षेत्रात करिअर करायचे असे ठरवले व घरची आर्थिक स्थिती बेेताचीच असल्यामुळे विविध कार्यक्रमातून मिळालेली बक्षीस आधार ठरतं. पुढे व्यावसायिकदृष्ट्याच या क्षेत्राशी जोडले गेले. आतापर्यंत राज्यात सहपर राज्यात विविध ठिकाणी लावणीचे कार्यक्रम सादर केले. आमचा ३० कलावंतांचा संच असून कार्यक्रम मिळाले तरच आर्थिक गाडा सुरळीत चालतो. कोरोनाच्या काळात तर आम्हाला अक्षरशः रस्त्यावर भाजी देखील विकावी लागली. सध्या कार्यक्रमाला मागणी आहे. परंतु, लावणीविषयी अनेक भागात गैरसमजूती आहेत. त्याचा त्रास होतो. कलावंतांना मान, सन्मान दिला जात नाही.त्याचे वाईट वाटते. चांगलेही प्रेक्षक आहेत. ज्यांना कलेची कदर आहे असे पुरुष, महिला प्रेक्षक कार्यक्रमांना येतात. लावणी ही महाराष्ट्राची अस्मिता असून ही कला टिकणे ही काळाची गरज आहे.

त्यासाठी शेवटपर्यंत या कलेशी एकरूप होऊनच काम करणार आहोत. ही मराठी मातीतील कला जिवंत राहण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे यावेळी कावेरी पुणेकर यांनी याप्रसंगी सांगितले. कोविड काळात जवळपास अडीच वर्षे लावणी, तमाशा व इतर सांस्कृतिक उपक्रमांत सहभागी होणाऱ्या कलावंतांनी मोठ्या हालअपेष्टा भोगल्या. मराठी मातीत जन्म घेणाऱ्या या कलेची साधना करणाऱ्या कलावंतांना शासनाने काही ना काही योजना आणून आरोग्य, कलावंतांच्या पाल्यांना शिक्षण व इतर सुविधा देण्याची आवश्यकता आहे. असे झाले तर कलावंतांना जगणे सुकर होईल, असे याप्रसंगी कावेरी पुणेकर यांनी सांगितले.

नगरपंचायतच्या वतीने कलावंतांचा सत्कार
पाटोदा नगरपंचायतीच्या वतीने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला, गटनेते बळीराम पोटे व सर्व नगरसेवकांच्या पुढाकारातून गणेशोत्सवानिमित्त लावणीचा कार्यक्रम घेण्यात आला. या लावणी कार्यक्रमाचे उद्घाटन पाटोदा पत्रकार संघाचे अध्यक्ष सोमीनाथ कोल्हे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले. याप्रसंगी सभापती रामेश्वर गोरे, हनुमंत काळे, नगरसेवक संतोष जाधव, राजू जाधव, नय्युम पठाण, सतीश घोलप, अॅड. सुशील कोठेकर व नगरसेवक हजर होते.

बातम्या आणखी आहेत...