आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्षीरसागर यांचे व्याख्यान:आयुष्यात कायम आशावादी राहायला शिका ; आर. बी. अटल महाविद्यालयात मिळाला प्रतिसाद

गेवराई19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयुष्य सुंदर आहे, फक्त आशावादी राहा. आयुष्यात अनेक चढ-उतार येत राहतील. त्याचा परिणाम तुमच्या ध्येयावर होऊ देऊ नका. तुम्हाला चांगले शिक्षक लाभले आहेत त्यांचे मार्गदर्शन घ्या. माझ्या आयुष्यात चांगले शिक्षक होते. त्यांच्यामुळेच मी दरोडेखोर होण्यापासून वाचलो असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षण तज्ञ तथा सामाजिक कार्यकर्ते प्रा. जय क्षीरसागर यांनी केले.र. भ. अट्टल महाविद्यालय येथे मराठी विभाग आणि समाजशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आयुष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमाचे व्याख्याते म्हणून ते बोलत होते.

शिक्षक दिनाच्या निमित्ताने आयोजित या विशेष व्याख्यानात आयुष्यात प्रचंड संघर्ष केलेले व्यक्तिमत्व म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. जय क्षीरसागर स्वतः अनाथ असून अनाथालयात राहत असताना उपासमारीमुळे चोरी करू लागले. त्यामुळे त्यांना बालसुधार गृहात ठेवण्यात आले होते. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे त्यांच्यात अमुलाग्र परिवर्तन होऊन ते मेरीटचे विद्यार्थी झाले. पुढे एका वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी करत असताना एका प्राध्यापिकेशी त्यांचा विवाह झाला. परंतु दोन मुलांच्या जन्मानंतर कालांतराने कर्करोगाने पत्नीचे निधन झाले. या दुःखातून सावरत नाहीत तोच आईच्या श्राद्धाची प्रार्थना करण्यासाठी अमेरिकेत कोटी रुपयांचे पॅकेज घेणारे दोन मुले गोव्याला गेले असता त्यांची बस नदीत कोसळून दोन्ही मुलांचा त्यात मृत्यू झाला. त्यांच्या आयुष्यातील प्रसंग ऐकून सभागृहातील अनेकांना अश्रू आवरता आले नाही. त्यांनी स्वतःचे आयुष्य उलगडून दाखवताना कुणाच्याही आयुष्यात असे प्रसंग येऊ नये आणि आले तर त्याने जीवनावरची निष्ठा सोडू नये असा संदेश दिला.

मराठी विभाग प्रमुख डॉ. संदीप बनसोडे यांनी प्रास्ताविक करताना कार्यक्रमाची संकल्पना स्पष्ट केली. तर समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रेवणनाथ काळे यांनी पाहुण्यांचा आणि अध्यक्षांचा परिचय करून दिला. डॉ. समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रेणुका संभाहरे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी मराठी विभागाचे प्रा. शरद सदाफुले, प्रा. राहुल लगड, समाजशास्त्र विभागाचे प्रा. दौलत मंचरे, डॉ. सुहास मचे, सुदर्शन निकम, अशोक पावनपल्ले यांनी परिश्रम घेतले. यावेळी उपप्राचार्य डॉ. प्रशांत पांगरीकर, आयक्यूएसी समन्वयक डॉ. प्रवीण सोनवणे, उपप्राचार्य राजेंद्र राऊत, पर्यवेक्षक चंद्रकांत पुरी, प्रबंधक बप्पासाहेब पिंपळे उपस्थित होते.

राज्यभर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, पेन्शनही अनाथांसाठी दान
अस्वस्थ करणाऱ्या प्रसंगांना धिरोधात्तपणे तोंड देऊन प्रा. जय क्षीरसागर आज महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, प्रबोधन करण्यासाठी फिरत आहेत. अनाथालयांना मदत करत आहेत. स्वतःची पेन्शन त्यांनी अनाथांसाठी दान केलेली आहे. त्यामुळे अशा समर्पित व्यक्तीला ऐकताना विद्यार्थी भारावून गेले होते.

बातम्या आणखी आहेत...