आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादोन वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर चारित्र्यावर संशय घेत व लग्नात अडथळा ठरेल म्हणून प्रेयसीला अॅसिड व पेट्रोल टाकून जाळणाऱ्या प्रियकराला जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जिल्हा सरकारी वकील अजय राख यांनी याबाबत माहिती दिली.
अविनाश राम किसन राजूरे (रा. शेळगाव ता. देगलूर जि. नांदेड) असे शिक्षा झालेल्या प्रियकराचे नाव आहे तर, सावित्रा डिगंबर अंकुलवार असे मृत प्रेयसीचे नाव आहे सावित्राचे २०१८ मध्ये लग्न झाले होते मात्र ती माहेरी रहात होती. या काळात तिचे गावातीलच अविनाश राजूरे सोबत प्रेमसंबंध निर्माण झाले होते यातून दोघेही पळून पुणे जिल्ह्यातील शिरुर घोडनदी येथे वास्तव्यास गेले होते. १३ नोव्हेंबर २०२० रोजी अविनाश याने सावित्राला आपल्याला बाहेर फिरायला जायचे असल्याचे सांगितले आणि दुपारी दुचाकीवरून दोघे निघाले. अडीचशे किमी नेकनूर पोलिस ठाणे हद्दीत केज- मांजरसुंबा रोडवर येळंब घाट येथील एका मंगल कार्यालयाजवळ आल्यानंतर अविनाशने आता रात्री उशीर झाला आहे म्हणून शेतात मुक्काम करु असे म्हटले. एका खदानीत दोघांनी मुक्काम केला. १४ नोव्हंेबर२०२० रोजी पहाटेच्या दरम्यान अविनाशने सावित्राचा गळा दाबला आणि सोबत आणलेले ऍसिड आणि पेट्रोलची बाटली काढून त्याने तिच्या चेहऱ्यावर आणि अंगावर ते ओतून तिला पेटवून दिले.
सकाळी एका गुरख्याला अर्धवट जळालेल्या अवस्थेत सावित्रा दिसून आल्यानंतर ही माहिती नेकनूर पोलिसांना दिली गेली. पोलिसांनी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करुन तिचा मृत्यू पूर्व जबाब नोंदवला व कुटुंबियांना माहिती दिली. काही तासातच तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. २४ तासांत पोलिसांनी अविनाशला अटक केली होती. डीवायएसपी भास्कर सावंत, एपीआय लक्ष्मण केंद्रे, पीएसआय विलास जाधव यांनी तपास करुन दोषारोपपत्र दाखल केले होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्या. हेमंत महाजन यांच्यासमोर सुनावणी झाली. सरकारी पक्षाकडून ३० साक्षीदार तपासले. अॅड. राख यांना माजी सरकारी वकील मिलिंद वाघीरकर यांनी सहकार्य केले.
न्या. महाजन यांनी अविनाशला जन्मठेप आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी म्हणून पीएसआय बी. व्ही. जायभाये, एएसआय सी. एस. इंगळे, परमेश्वर सानप यांनी काम पाहिले.
सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे : सावित्रा व अविनाश सोबत निघालेले सीसीटिव्ही फुटेज, पेट्रोल टाकताना पंपावरचे फुटेज, टोल नाक्यावरचे फुटेज यामध्ये दोघे सोबत होते मात्र खुनानंतर अविनाश गावी जाताना त्याने अन्य एका पंपावर पेट्रोल टाकले त्या फुटेजमध्ये तो एकटाच होता. हा पुरावाही महत्वाचा ठरला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.