आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालक्यातील श्री क्षेत्र नेकनूर येथे श्रीराम मंदिरात संत सुदामदेव महाराज यांच्या २० व्या पुण्यतिथी उत्सवाची रविवारी (ता.१० एप्रिल) काल्याच्या कीर्तनाने थाटात सांगता झाली. पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी उत्सवास हजेरी लावत काल्याच्या कीर्तनाचा आस्वाद घेतला. याप्रसंगी दही हंडी फोडून महाप्रसाद वाटप करण्यात आला. तसेच हजारोंच्या पंगतीत बुंदी आणि लाही चिवड्याचा महाप्रसाद वाटप केला गेला.
महंत लक्ष्मण महाराज मेंगडे यांनी संत तुकाराम महाराज यांच्या ‘तुझिये संगती झाली अमुची निश्चिती, नाही देखिलेते मिळे भोग सुखाचे सोहळे, घरी ताकाचे सरोवर तेथे नविताचे पुर, तुका म्हणे आता आम्ही न वजो दवडीता’या अभंगावर चिंतन मांडले. प्रभू राम हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. त्यांचे आदर्श तत्त्व आजही इथला समाज व्यवस्थेला दिशा दाखवतात, लक्ष्मण महाराज मेंगडे यांनी सांगितले. कीर्तनप्रसंगी रामजन्मोत्सवही पार पडला. भगवंताच्या दहा अवतारांपैकी राम आणि कृष्ण अवतार पूर्ण आहेत. राम अवतारातील चरित्र आचरणात आणावे तर कृष्ण रामअवतारातिल चरित्र फक्त उच्चार करावा, असेही त्यांनी सांगितले. संत सुदामदेव महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त बोलताना बाबांचे आयुष्य हे त्यागी होते. गुरू सेवेत सर्वस्व अर्पण करणारे इच्छा मरणी साधू आपल्याला लाभले हे भाग्य आहे. गोरगरीब जनतेच्या दुःख मुक्तीसाठी व आत्म उद्धारासाठी बाबांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केले. प्रेमळ अंतःकरणाचा दयाळू साधू, अशी सुदामदेव महाराज यांची ओळख असल्याचेही मेंगडे महाराजांनी सांगितले. गायनाचार्य अभिमान महाराज ढाकणे, तुकाराम महाराज करडकर, अच्युत महाराज घोडके, दिनेश महराज काळे, रणजित महाराज शिंदे आदींची उपस्थिती होती.
कीर्तन मंडप उभारणार : बंकट स्वामी संस्थान हे माझे श्रद्धास्थान आहे. इथे कुठल्याही गोष्टीची कमी पडू देणार नाही. यावर्षी कीर्तनामधील भाविक कपड्याच्या मंडपात आहेत. पुढच्या वर्षी इथे भव्य कीर्तन मंडप उभा राहील. त्या मंडपात कीर्तन होईल, असे आश्वासन आमदार विनायक मेटे यांनी दिले.
महाप्रसदाची अशी व्यवस्था
महाप्रसादासाठी १५ पोते साखर, १२ पोते डाळ तर तेल २ टाक्या आणि मुरमुरे ५० पोते उपलब्ध करण्यात आले होते. यासह भाविकांसाठी पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.