आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिला श्रावण सोमवार:भक्तांनी फुलली जिल्ह्यातील महादेव मंदिरे, प्रभू वैद्यनाथांच्या दर्शनासाठी पहाटेपासून रांगा

बीड12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या दोन वर्षांच्या खंडानंतर पहिल्या श्रावण सोमवारी बीड जिल्ह्यातील परळी येथील प्रभू वैद्यनाथांसह बीड शहरातील कनकालेश्वर, शिरूर येथील सिद्धेश्वर, केज तालुक्यातील हनुमंत पिंपरी येथील उत्तरेश्वर, गेवराई शहरातील चिंतेश्वर, अंबाजोगाई येथील खोलेश्वर येथील पुरातन महोदव मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी रीघ लावली होती. गेवराईतील चिंतेश्वर मंदिरात पहाटे चारपासून भाविकांची रीघ होती. केज तालुक्यातील उत्तरेश्वर पिंपरी येथील उत्तरेश्वराला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून आरती करण्यात आली. परळीत ट्रस्टींच्या हस्ते वैद्यनाथाची पारंपरिक पूजा करण्यात आली. बीड शहरातील यादवकालीन कनकालेश्वर मंदिरातही सोमवारी पहाटेपासून शहरातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. त्याचबरोबर शहरातील पापनाशेश्वर, नीलकंठेश्वर, सोमेश्वर, बीड तालुक्यातील मोरगाव येथील नागनाथ मंदिर, बेलगाव येथील बेलेश्वर, कपिलधार, चाकरवाडी , नारायणगड येथील शिवमंदिरांतही भाविकांची गर्दी होती.

शिरूर : सिद्धेश्वराला रीघ
येथील सिद्धेश्वर मंदिर, कपारीचा महादेव, मानूरचे नागनाथ मंदिर, उकंडा चकल्याचा पंचमुखी महादेव या मंदिरांत महिलांनी बेलफूल वाहून दर्शन घेतले. भाविकांना रांगेत दर्शन घेता यावे म्हणून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

गेवराई : चिंतेश्वराला पहाटे चारपासून भाविकांची गर्दी
चिंतेश्वर मंदिरात पहाटे चार वाजल्यापासून मन्यारवाडी, गोविंदवाडी, मुळुकवाडी, कुंभारवाडीसह मिरकाळा, वडगाव ढोक, रांजणी येथील हजारो भक्तांनी गर्दी केली होती. चिंतेश्वर संस्थानचे दिलीप महाराज घोगे यांनी भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था केली. शिवभक्त अंबादास गिरी यांनी गोदावरीच्या पात्रातून कावडीने पाणी आणून जलाभिषेक केला. याशिवाय पंचमुखेश्वर संस्थान भाटेपुरी, गोरक्षनाथ संस्थान कुंभेजळगाव, मनेश्वर संस्थान तळेवाडी, संगमेश्वर संस्थान मळी येथेही भाविकांनी गर्दी केली होती.

केज : भाविकांनी केला अभिषेक
तालुक्यातील उत्तरेश्वर पिंपरी येथील उत्तरेश्वर मंदिरात सकाळी पुजारी अतुल मोकाशी व लक्ष्मण मोकाशी यांनी बेलपत्र वाहून अभिषेक करत उत्तरेश्वराला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून आरती केली. त्यानंतर भाविकांनी अभिषेक करीत बेलपत्र वाहून दर्शन घेतले. तिसऱ्या सोमवारी उत्तरेश्वर महाराजांची पालखी मंदिरातून बाहेर काढून उत्तरेश्वराला नदीचे स्नान घातले जाणार आहे.

परळीत पारंपरिक महापूजा
बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी येथील प्रभू वैद्यनाथाचा श्रावण पर्व शुभारंभाचा रुद्राभिषेक देवस्थानचे सचिव प्रा. प्रदीप देशमुख व त्यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते रुद्राभिषेक करण्यात आला.

अंबाजोगाईत खोलेश्वराला गर्दी
पहिल्या श्रावण सोमवारी शहरातील जागृत खोलेश्वर मंदिर, योगेश्वरी देवीचे मंदिर, आम्लेश्वर मंदिर व घाट नागनाथ मंदिरात महिला व पुरुष भावकांनी गर्दी केली होती. सोमवारी शिवामूठ म्हणून महादेवाच्या पिंडीवर तांदूळ वाहण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...