आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनामुळे बंद असलेल्या शाळा अखेर येत्या ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात शिक्षण विभाग कामाला लागला असून ग्रामीण भागातील १८४६ तर शहरी भागातील २५५ शाळा सुरू होणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी दिली.
कोरोना महामारीमुळे मार्च २०२० पासून शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीनेच अध्यापन केले जात आहे. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये व त्यानंतर जानेवारी २०२१ मध्ये शाळा सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पुन्हा शाळा बंद केल्या होत्या. ज्या ठिकाणी शाळा सुरू झाल्या होत्या तिथेही फारसा प्रतिसाद मिळालेला नव्हता. त्यामुळे ऑनलाइन अध्यापनावरच भर दिला जात होता. मात्र, अनेक विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाइल नसणे, नेटवर्कच्या अडचणी, ऑनलाइन अभ्यासक्रम न समजणे अशा तक्रारी होत्या. शिवाय, दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे परीक्षाही झालेल्या नव्हता.
सर्वच वर्गांचे विद्यार्थी परीक्षा न देताच पास केले. आता कोरोना स्थिती आटोक्यात आली असून सर्वत्र बाजारपेठा खुल्या आहेत, असे असतानाही राज्य शासन शाळा सुरू करत नसल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने शाळा सुरू करण्यासाठी शासनावर दबाव वाढत होता. अखेर, शुक्रवारी राज्य शासनाने ४ ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू होतील तर शहरी भागात ८ वी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत.
ग्रामपंचायतीचा ठराव, पालकांची संमती आवश्यक
गावातील शाळा सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतींना ठराव द्यावा लागणार आहे. ग्रामपंचायतींच्या ठरावानंतरच शाळा सुरू होणार आहेत. २ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात गांधी जयंतीनिमित्त ग्रामसभा होणार आहे. या ग्रामसभांमध्ये शाळा सुरू करण्याचा ठराव घेतला जाईल. शिवाय, मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांचीही संमती आवश्यक असणार आहे.
१० हजार शिक्षकांचे लसीकरण : जिल्ह्यात १० हजार शिक्षकांचे कोरोना लसीकरण झाले. परंतु, अद्यापही दीड हजार शिक्षकांचे लसीकरण बाकी आहे. सर्व शिक्षकांनी लस घ्यावी, मगच शाळेवर जावे, अशा सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्यात.
मुख्याध्यापकांना दिल्या सूचना
शाळा सुरू करण्याच्या अनुषंगाने दोन दिवस जिल्ह्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेण्यात आली. त्यांना योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना केल्यात. सोमवारी शाळा सुरू करण्याबाबतची परवानगीची फाइल जिल्हाधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात येणार आहे. - श्रीकांत कुलकर्णी, शिक्षणाधिकारी, जि. प. बीड.
स्वच्छतेसह काेराेनाबाबतचे नियम पाळण्यासाठी शाळांना द्यावे लागेल लक्ष
शाळा सुरू झाल्यावर कशी घेणार काळजीॽ
शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी हँड वॉश स्टेशन शाळेत केले जाईल, मास्क वापरावा लागेल. सॅनिटायझरचा वापर केला जाईल. शिवाय, थर्मल गनद्वारे शरीराचे तापमान तपासले जाईल.
विद्यार्थी आजारी असेल तर शाळेत पाठवावा का ?
विद्यार्थी आजारी असल्यास पालकांनी विद्यार्थ्याला तो बरा हाेईपर्यंत शाळेत पाठवू नये.
पहिले २ आठवडे शिकवू नका, असा आदेश का?
सुमारे पावणेदाेन वर्षांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांची सवय मोडलेली आहे. त्यामुळे पहिल्या दोन आठवड्यांत मुले कमी प्रमाणात येतील. त्यामुळे थेट अभ्यासक्रमाला सुरुवात करू नये, अशा सूचना आहेत.
पहिले दोन आठवडे शाळेत काय शिकवणारॽ
पहिले दोन आठवडे यापूर्वीच्या ऑनलाइन अभ्यासक्रमाची उजळणी घेतली जाईल, मुलांचे खेळ घेतले जातील. ज्यामुळे मुले शाळेत रमायला सोपे होईल. त्यांना पुन्हा शाळेची आवड निर्माण होईल.
...तर शाळा होणार बंद
ज्या गावातील शाळा सुरू असतील तिथे कोरोना रुग्णांची संख्या खूप जास्त प्रमाणात वाढली अथवा शाळांमध्ये बाधित विद्यार्थ्यांची संख्या वाढली किंवा शाळेतील सर्व शिक्षक बाधित झाले तर शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देेण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.