आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्दैवी:बालविवाह करून ऊसतोडणीला जुंपले; प्रसूतीनंतर मुलीने पोटचा गोळा गमावला

माजलगाव / दिलीप झगडेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

ऊसतोड कामगार कुटुंबातील सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा माहेर व सासरच्या लोकांनी विवाह लावला. त्यानंतर ती गर्भवती राहिली व प्रसूतीसाठी तिला कर्नाटकातील एका शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु प्रसूतीनंतर मृत बाळ जन्मल्याने हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, माजलगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीच्या विवाहप्रकरणी मुलीचे आईवडील, मुलीचा पती, सासू, सासरा अशा एकूण पाच जणांवर पोस्को कायद्यांतर्गत माजलगाव ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

माजलगाव तालुक्यातील एका गावातील ऊसतोड कामगार कुटुंबातील अल्पवयीन मुलीचा विवाह लावण्यात आला होता. विवाहानंतर ऊसतोड कामगार कुटुंबातील या मुलीस सासरच्या लोकांना ऊस तोडणीसाठी कर्नाटक येथील कारखान्यावर पाठवले होते. ही मुलगी गरोदर असल्याने तिला रविवार ५ डिसेंबर २०२१ रोजी कर्नाटक राज्यातील बेळगाव येथील मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या हॉस्पिटलमध्ये या अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिला. प्रसूतीनंतर जन्मलेल्या बाळाचा दुर्दैवाने एकाच दिवसात मृत्यू झाला. दरम्यान, हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याबाबत मुलीच्या वयाची पडताळणी केली असता मुलीचे वय १६ वर्षे ११ महिने आढळून आले. मुलगी अल्पवयीन असताना तिच्या बरोबर दिलीप राठोड या तरुणाने शारीरिक संबध ठेवले. यातूनच ती गर्भवती राहिली होती. याप्रकरणी उपनिरीक्षक नीलेश ईधाते यांनी माजलगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मुलीचे वडील उत्तम चव्हाण व आई विमलाबाई उत्तम चव्हाण, मुलीचा सासरा राजू किसन राठोड, सासू सुंदराबाई राजू राठोड, मुलीचा पती दिलीप राजू राठोड यांच्यावर अल्पवयीन मुलगी असताना तिचा विवाह लावणे, बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षक अधिनियम, बालविवाह प्रतिबंधक कायदा व पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.

...तर दोन वर्षांपर्यंतची शिक्षा शक्य
बालविवाह हा कायद्याने गुन्हा ठरतो. १९२९ मध्ये हा कायदा केला गेला. त्यात पुढे सुधारणा होऊन देशात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ करण्यात आला व १ नोव्हेंबर २००७ पासून तो अमलात आला. जाणीवपूर्वक बालविवाह ठरविणाऱ्यास, त्यासाठीचा सोहळा पार पाडण्यास किंवा प्रोत्साहन देणाऱ्यास दोन वर्षे सक्तमजुरी, एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.- तत्त्वशील कांबळे, बालकल्याण समिती सदस्य, बीड.

अल्पवयीन मुलीचे शरीर हे प्रजोत्पादनासाठी तयार नसते
बालविवाह झाला तर मुलीचे शरीर हे प्रजोत्पादनासाठी तयार नसते. मुलीची शारीरिक व मानसिक तयारी यासाठी झालेली नसते. बालवयात गर्भधारणा झाल्यास माता व बाळ दोघांचेही कुपोषण होण्याची शक्यता असते किंवा बाळंतपणात माता व बाळ दोघांचाही मृत्यू होऊ शकतो.
डॉ. शरद शिंदे, स्त्रीरोगतज्ज्ञ, द्वारका हॉस्पिटल, बीड.

बालविवाहाची प्रमुख कारणे कोणती
ऊसतोडणीला जाणारे मजूर जिल्ह्यात अधिक आहेत अशावेळी मुलींना घरी एकटीला ठेवता येणे सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य वाटत नाही. त्यामुळे त्यांचे लग्न करून दिले जाते. शिवाय, अज्ञान, गरिबी, शिक्षणाचे कमी प्रमाण, हुंडा ही कारणेही आहेत.

कुठे आणि कशी करता येते तक्रार
बालविवाहाबाबत तक्रारीसाठी जवळचे पोलिस ठाणे, १०९८ हा चाइल्ड लाइनचा क्रमांक, १०९१ हा महिला तक्रारचा क्रमांक, ११२ हा पोलिस नियंत्रक कक्षाचा क्रमांक यांच्याकडे तक्रार करता येते.

का वाढले बालविवाह
जिल्ह्यात गरिबी, शिक्षणाचे प्रमाण कमी असणे व बालविवाह न होण्याबाबतची जागृती कमी असल्यामुळे बालविवाह होत आहेत. बेरोजगारी असल्याने बहुतांशी कुटुंबे परजिल्ह्यात ऊसतोडणीला जातात. याशिवाय कुटुंबाचा भार सोसणे अवघड होते म्हणून अल्पवयीन असताना गरीब कुटुंब मुलींचे लग्न लावून मोकळे होतात.

बातम्या आणखी आहेत...