आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसैनिकांत ‘फ्री’स्टाइल:माजलगावातील प्रकार सोळंकेंना मारहाण, 7 जणांवर गुन्हा; शिवसैनिकास डावलले, सोळंकेंचा आरोप

माजलगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शहरप्रमुख, जिल्हाध्यक्ष गटात राडा; अप्पासाहेब जाधव यांच्यावर ऑइल फेकण्याचा प्रयत्न

शिवसेना जिल्हा प्रमुखपदावर माजलगावचे अप्पासाहेब जाधव यांची नियुक्ती झाल्यानंतर सेनेत अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. गुरुवारी माजलगावात हाणामारीचे वळण लागले. निवडीनंतर माजलगाव शहरात आलेल्या जाधवांच्या स्वागताच्या रॅलीत शिरून शहर प्रमुख धनंजय सोळंकेंनी त्यांच्या अंगावर ऑइल फेकण्याचा प्रयत्न केला. यानंतर जाधव समर्थकांनी सोळंकेंना जबर मारहाण केली. याप्रकरणी गुरुवारी रात्री सोळंकेंच्या तक्रारीवरून मारहाण करणाऱ्या सात जणांविरोधात शहर पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे.

जिल्हा शिवसेनेत दोन जिल्हा प्रमुख आहेत. यातील एक जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांच्याकडे माजलगाव, केज आणि परळी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी होती परंतु, मंगळवारी पक्षाने मुळूक यांना पदावरून हटवत माजलगावचे तालुका प्रमुख अप्पासाहेब जाधव यांच्याकडे जिल्हा प्रमुखपदाची सूत्रे दिली. या निवडी विरोधात पहिल्या दिवसापासून माजलगावचे शहर प्रमुख धनंजय ऊर्फ पापा साेळंके यांनी विरोध दर्शवला होता. नियुक्ती झाली त्यावेळी अप्पासाहेब जाधव मुंबईत तळ ठोकून होते.

निवडीनंतर गुरुवारी ते पहिल्यांदाच शहरात येत असल्याने त्यांच्या समर्थकांनी स्वागतासाठी रॅलीचे नियोजन केले होते. रॅली निघताच छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरात दुचाकीवरून आलेले शहर प्रमुख धनंजय सोळंकेंनी जाधव यांच्या दिशेने ऑइलची बाटली फेकून निषेध करण्याचा प्रयत्न केला. यानंतर जाधव समर्थकांनी भररस्त्यात सोळंकेंना बेदम मारहाण केली. यात सोळंके जखमी झाले.

उपचारानंतर सोळंकेंची पाेलिसांत तक्रार

ग्रामीण रुग्णालयात उपचारानंतर सोळंकेंनी शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार ते दुचाकीवरून जाताना एका जीपचा (एम एच ४४ जी ४६६४) चालक माउली गायकेने जीपचा दरवाजा अचानक उघडला. सोळंकेंना अडवले. यानंतर त्यांना पाच ते सात जणांनी मारहाण केली. बेल्ट, वायर, पाइपने ही मारहाण केली. या गोंधळात त्यांची ५ ग्रॅम सोन्याची अंगठी, तीन ग्रॅमची दुसरी अंगठी हरवली. याप्रकरणी मुंजा कडाजी जाधव (रा. माजलगाव), माउली गायके (रा. पवारवाडी, ता. माजलगाव), महादेव वैराळे (रा. कोथळा, ता. माजलगाव), सुखदेव धुमाळ (रा. पवारवाडी), सुरेश पाष्टे (रा. मोटेवाडी) यांच्यासह अनोळखी दोघांवर पाेलिसांत गुन्हा नोंद केला.

जाधव जिल्हाप्रमुख झाल्यानंतर जुन्या वादाला निखारे फुटले
धनंजय सोळंके आणि अप्पासाहेब जाधव यांच्यात जाधव हे राष्ट्रवादीतून शिवसेनेत आल्यापासूनच वाद आहे. जाधव यांची तालुकाप्रमुख म्हणून निवड झाली त्यावेळीही सोळंकेंनी चांगलाच वाद घातला होता. येथूनच शिवसेनेत गटातटाला सुरुवात झाली होती. प्रत्येक वेळी कार्यक्रम, आंदोलनेही वेगवेगळी होत होती. याच जुन्या वादाला पुन्हा जाधव हे जिल्हाप्रमुख झाल्यानंतर निखारे फुटले आहेत.

जाधव यांच्या निवासस्थानी सुरक्षा
या प्रकारानंतर आणखी वाद वाढू नये म्हणून पोलिसांनी अप्पासाहेब जाधव यांच्या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था वाढवली. दरम्यान, उशिरापर्यंत याप्रकरणी पोलिसांनी कुणाला ताब्यात घेतले नव्हते तर जाधव गटाकडूनही उशिरापर्यंत तक्रार दिली गेली नव्हती.

शिवसेना स्टाइलनेच उत्तर दिले
माझी निवड ही शिवसेना पक्षप्रुमखांनी व वरिष्ठ नेत्यांनी केली. याबाबत काही जाब विचारायचा असेल तर तो त्यांना विचारणे अपेक्षित आहे. सोळंकेंनी अंगावर ऑइल फेकण्याचा प्रयत्न केला ही चुकीची बाब आहे. यामुळे चिडलेल्या कार्यकर्त्यांनी शिवसेना स्टाइलनेच सोळंकेंना उत्तर दिले. अप्पासाहेब जाधव, जिल्हा प्रमुख, शिवसेना

भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो
कडवट शिवसैनिकांना जिल्हाप्रमुख पदासाठी पक्षश्रेष्ठींनी डावलले याचा निषेध मी करत असताना जिल्हा प्रमुखांसह कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला केला. मला मारहाण केली. मी अशा प्रकारांना घाबरत नाही. या मारहाणीचाही मी तीव्र निषेध करतो. धनंजय सोळंके, शहरप्रमुख, शिवसेना.

बातम्या आणखी आहेत...