आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रा. पं. निवडणूक:माघारीसाठी मनधरणी, विविध आमिषे, आता दहा दिवस प्रचाराची रणधुमाळी

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामपंचायत निवडण्ूकीच्या प्रक्रियेत बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस होता. बंडखोर, अपक्षांची मनधरणी करता करता पॅनल प्रमुखांच्या नाकी नऊ आल्याचे पहायला मिळाले त्यामुळे अखेरच्या क्षणी अर्ज मागे घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. दुपारी ३ पूर्वी तहसील कार्यालयात प्रवेश दिलेल्या उमेदवारांचे अर्ज मागे घेण्याची व चिन्ह वाटपाची प्रक्रिया रात्री साडेआठ नंतरही सुरु होती. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे चित्र उशीरापर्यंत स्पष्ट नव्हते. १८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

७०४ ग्रामपंचायतींच्या ५ हजार ७४६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम राबवला जात आहे. २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या काळात अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया राबवली गेली होती. ऑनलाइन अर्जांसाठीअडचणी आल्याने अखेरच्या दिवशी ऑफलाइन अर्ज करण्यास मुभा दिली गेल्याने मोठ्या प्रमाणावर शेवटच्या दिवशी अर्ज दाखल झाले होते.

एकूण २४ हजार ७७ अर्ज आले होते. यात, सरपंचपदासाठी ४ हजार २१६ तर, सदस्यपदासाठी १९ हजार ८६१ अर्ज होते. सोमवारी अर्जांची छाननी करण्यात आली यात, सरपंचपदाचे १९ तर, सदस्यपदाचे २०१ अर्ज अवैध ठरले होते. उर्वरित सरपंचाच्या ४ हजार ९७ आणि सदस्यांच्या १९ हजार ३७१ अर्जांमधून निवडणूकीतून माघार घेण्याचा बुधवारचा दिवस होता. गावकीच्या या लढाईत अडचणीच्या ठरु शकणाऱ्या उमेदवारांची मनधरणी करुन त्यांना माघार घ्यायला लावताना पॅनल प्रमुख दिसून आले. त्यामुळे जिल्ह्यात अखेरच्या क्षणी अर्ज मागे घ्यायला गर्दी झाली होती. अंबाजोगाई तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक सुरु असून सरपंच पदाच्या १७३ जणांनी तर सदस्यपदाच्या ५६१ जणांनी माघार घेतली.पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

शिरुर : तालुक्यातील २४ ग्रा.पं. सरपंचासाठी ६७ जण रिंगणात शिरुर तालुक्यात २४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी एकूण १६७ अर्ज आले होते त्या पैकी २ अर्ज अपात्र झाले उर्वरित १६५ पैकी ९८ जणांनी बुधवारी माघार घेतली त्यामुळे ६७ जण रिंगणात आहेत तर, सदस्यपदासाठी एकूण ७८२ अर्ज दाखल झाले होते त्या पैकी ५ अर्ज अपात्र ठरले उर्वरित ७७६ पैकी २९० जणांनी माघार घेतल्याने आता ४८६ जण सदस्यपदासाठी निवडणूक लढणार आहेत.

धारुर : तीन ग्रामपंचायती बिनविरोध, इतर ठिकाणी चुरस ३१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. बुधवारी सरपंचपदासाठी दाखल झालेल्या अर्जांपैकी ८१ जणांनी माघार घेतली त्यामुळे आता ८६ जण निवडणूक लढत आहेत. तर, सदस्यपदांसाठी दाखल अर्जांपैकी २०८ जणांनी अर्ज परत घेतले त्यामुळे ५४४ जण निवडणूक रिंगणात आहेत. दरम्यान, तालुक्यातील कोयाळ, मैदवाडी, घागरवाडा या तीन ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या.

वडवणी : २५ गावांत ८४ जणांना व्हायचेय सरपंच तालुक्यात २५ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. यामध्ये, सरपंचपदासाठी वैध ठरलेल्या अर्जातून ७५ जणांनी अर्ज परत घेतले त्यामुळे आता ८४ जण सरपंच होण्यासाठी रिंगणात असतील तर, सदस्यपदांच्या वैध अर्जातून २६४ जणांनी माघार घेतली त्यामुळे ४६३ जण २४ सदस्य होण्यासाठी निवडणूक लढत आहेत.

मतदारांशी संपर्क साधण्यासाठी होणार कसरत दरम्यान, अर्ज मागे घेऊन निवडणूक चिन्हही बुधवारी उमेदवारांना वाटप करण्यात आले. यामुळे आता खऱ्या अर्थाने प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. १८ डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याने उमेदवारांना प्रचारासाठी अवघे दहा दिवस मिळणार आहेत. त्यामुळे कमी काळात सर्व मतदारांशी संपर्क साधताना उमेदवारांची धावपळ होणार आहे हे नक्की.

बातम्या आणखी आहेत...