आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:बीडमध्ये रविवारपासून रंगणार मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन

बीड24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवारपासून बीड शहरात २६ वे मराठी-ख्रिस्ती साहित्य संमेलन रंगणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी पुणे येथील साहित्यिक पौलस वाघमारे यांची निवड झाली असून, अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे आशिष शिंदे हे स्वागताध्यक्ष आहेत. ६ जे ८ नाेव्हेंबरदरम्यान होणाऱ्या या संमेलनात विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

रविवारी दुपारी साडेबारा ते अडीच या वेळेत बीड शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. दुपारी ४ वाजता उद््घाटन होणार असून यासाठी विविध मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये पुस्तक प्रकाशन आणि संमेलनाच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन होईल. या कार्यक्रमात सोलापूर येथील साहित्यिक सतीश गडकरी हे सुवार्ता प्रसार या विषयावर मनोगत व्यक्त करतील, तर स्वरलता आंग्रे या बायबलमधील अभिषिक्त पिता या विषयावर बोलणार आहेत. ज्येष्ठ कवी सायमन मार्टिन यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन पार पडणार आहे. यात पास्कोल लोबो, नरेश चव्हाण, फॅक्रो डिसोझा, सुरेश निर्मळ, समीर गायकवाड, डॅनियल ताकवले, लईस कदम, नंदकुमार शेंडगे हे मान्यवर कवी सहभागी होतील. रात्रीच्या जेवणानंतर नागपूर येथील सुगम स्वरांजली यांची संगीत रजनी होणार आहे.

७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता नागपूर येथील वैभव मनू हे शेतकऱ्याच्या आत्महत्या या विषयावर शोधनिबंध सादर करतील. सकाळी ११ वाजता विवाहितांच्या घटस्फोटांची कारणे यावर परिसंवाद होईल. अॅड. विनायक पंडित, पी.के. आकसाळ, मृदुला घोडके, डॅनियल ताकवले यांचा सहभाग असेल. दुपारी १ वाजता ख्रिस्ती समाजाविषयी समज-गैरसमज या विषयावर परिसंवाद होईल. यात परीक्षित खुडे, प्रशांत केदारी, स्वरूप घाडगे, अशोक तुरक्याल व क्षितिज गायकवाड यांचा सहभाग असेल. दुपारी ३ वाजता कथाकथन होणार असून यात मंगला वागळे, लुईस कदम, फ्रँको डिसोझा, आदेश पाटील, अॅनी सोनवणे यांचा सहभाग असेल.

दुपारी ५ वाजता ख्रिस्ती साहित्य परंपरा या विषयावर अनिल दहिवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्र होणार असून यात प्रकाश भालेराव, पास्कोल लोबो, विवेक निर्मळ, किशोर पाटील यांचा सहभाग असेल. ८ वाजता वसंत गायकवाड यांचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर किरण काळे यांची भजन संध्या होईल. पत्रकार परिषदेत ही माहिती दिली गेली. या वेळी आशिष शिंदे, फादर प्रकाश भालेराव, रेव्ह. चार्ल्स सोनवणे यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

आठ नोव्हेंबर रोजी होणार समारोप
या संमलेनाचा ८ नोव्हेंबर रोजी समारोप होणार आहे. या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता कल्पना सिरसाठ यांचे गायन, त्यानंतर सकाळी सव्वादहापासून ख्रिस्ती साहित्यिकांची सामाजिक जबाबदारी या विषयावर परिसंवाद होईल. दुपारी १२ वाजेपासून खुले अधिवेशन होणार आहे.

मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचा इतिहास
मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाची सुरुवात १९२७ साली झाली आणि त्यांचे पहिले अध्यक्ष अहमदनगरचे रेव्हरंड डॉ. निकल मेकॅनिकल होते. खरे पाहता मराठी ख्रिस्ती साहित्याचा उगम १८४२ ला अहमदनगर येथे प्रकाशित होणाऱ्या ज्ञानोदय या नियतकालिकापासून झाला. ज्ञानोदयने स्वातंत्र्य लढ्यात ही खूप महत्त्वाची भूमिका पार पाडल्याच्या नोंदी इतिहासात आहेत. असे हे ऐतिहासिक वारसा असणारे संमेलन या वेळी बीड येथे होत आहे ही साहित्यिक व महाराष्ट्रासाठी मोठी मेजवानी आहे.

बातम्या आणखी आहेत...