आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वास्तव:मराठवाडा कुपोषणाच्या विळख्यात; 7 जिल्ह्यांत 18 हजार कुपोषित बालके, धडक मोहिमेचा अहवाल

बीड / अमोल मुळेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या काळात मराठवाड्यातील बालके कुपोषणाच्या विळख्यात सापडल्याचे समोर आले आहे. सात जिल्ह्यांमध्ये १८ हजार बालके कुपोषित आढळून आली. यापैकी १४ हजार ५६१ बालके मध्यम कुपोषित आहेत, तर ३ हजार ५९५ बालके तीव्र कुपोषित आहेत. शासनाने १ ते ३१ ऑगस्टदरम्यान राबवलेल्या धडक मोहिमेच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.

कोरोना काळात मार्च २०२० पासून अंगणवाड्या बंदच असून अंगणवाडी ताईंनाही कोरोना सर्वेक्षणाची कामे दिली गेली. अंगणवाडीमध्ये दिला जाणारा पोषण आहार बालकांना घरी दिला जात होता. मात्र त्यांची आरोग्य तपासणी वर्षभरापासून बंदच होती. त्यामुळे कुपोषणाचे प्रमाण गतवर्षी समोर आले नव्हते. दरम्यान, कुपोषणाचे प्रमाण शोधण्यासाठी १ ते ३१ ऑगस्ट या काळात महिला व बालविकास विभागातर्फे राज्यात धडक मोहीम राबवली गेली होती. सर्व बालकांची आरोग्य तपासणी केली गेली होती. याचा अहवाल नुकताच समोर आला असून मराठवाड्यात सात जिल्ह्यांत तब्बल १८ हजार कुपोषित बालके आढळून आली आहेत.

उस्मानाबादमध्ये कासवगतीने सर्वेक्षण
दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यात कुपोषणाच्या सर्वेक्षणाचे काम कासवगतीने होत असून ३१ ऑगस्टपर्यंत राबवण्याची मुदत असतानाही सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यातही सुरूच होती. आमचे अनेक सीडीपीओ प्रशिक्षणासाठी गेल्याने मोहीम थंडावल्याचे उस्मानाबादचे महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी निपाणीकर यांनी सांगितले.

तीव्र कुपोषित मुले सरकारी रुग्णालयांच्या एनआरसी केंद्रात नेणार
दरम्यान, मध्यम कुपोषित आढळलेल्या बालकांना गावस्तरावरच ग्राम बालविकास केंद्रात भरती केले जाईल. या मुलांना गावातच पोषणयोग्य तो पोषण आहार या केंद्रातून देऊन त्यांना सुपोषित करण्याचे काम केले जाणार आहे. जी मुले तीव्र कुपोषित असतील अशा मुलांना सरकारी रुग्णालयांच्या एनआरसी केंद्रात उपचारासाठी भरती केले जाईल. - चंद्रशेखर केकाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प., बीड

कोरोनाकाळात कुपोषण का वाढले?
अंगणवाड्या बंद असल्याने मुलांना पोषण आहार मिळाला नाही. शिवाय अनेक कुटुंबांची लॉकडाऊन काळात खाण्याची आबाळ झाली. त्यामुळे या काळामध्ये कुपाेषण वाढल्याची नाेंद आहे.

मुलांना घरपोच आहार दिला जात होता?
टेक होम रेशन उपक्रमातून मुलांना आहार घरपोच दिला गेला असला तरी लॉकडाऊन काळात अनेक कुटुंबांची उपासमार होत होती. त्या कुटंुबातील सर्वच सदस्यांनी हा आहार घेतला. त्यामुळे केवळ बालकांनाच तो मिळाला असे नाही.

आणखी काय कारणे?
कुपोषणाचे प्रमाण हे वजन, उंची, दंडघेर आदी निकषांवर ठरते. शिवाय मुलांना जाे संतुलित आहार मिळणे अपेक्षित असते तो मिळाला नाही. अंगणवाडी ताईंनाही कोरोनाची कामे असल्याने त्यांनाही लक्ष देता आले नाही.

बातम्या आणखी आहेत...