आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्र विशेष:लोककलावंतांच्या मुलांसाठी झटणाऱ्या मयूरी राजहंस

बीड / अमोल मुळे5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राची लोककला तमाशावर कोरोनामुळे ‘पडदा’ पडण्याचीच वेळ आली. वर्षातील सुमारे ९ महिने गावाेगाव भटकंती करत तमाशाचे ‘खेळ’ करणाऱ्या कलावंतांच्या आयुष्याचा ‘खेळ’ झाला. मात्र, त्यांच्या मुलांच्या आयुष्याचा ‘तमाशा’ होऊ नये यासाठी शिरूर कासार तालुक्यातील ब्रह्मनाथ येळंब येथे मयूरी राजहंस “सेवाश्रमा’च्या माध्यमातून कार्यरत आहेत. यांच्या प्रयत्नांमुळे आज कित्येक मुलांचे भविष्य बदलले आहे. अन्यथा मुलांच्या पदरी तंबू ठोकण्याचे आणि मुलींच्या नशिबी पायात चाळ बांधून बोर्डावर थिरकणं आलं असतं. तमाशा कलावंत फडाचे बिऱ्हाड पाठीवर घेऊन नऊ महिने भ्रमंती करतात तेव्हा मुलांना नातलगांच्या घरी ठेवून जातात. राजहंस यांनी अहमदनगर, जामखेड, शेवगाव, पुणे या परिसरातील तमाशा कलावंतांचे सर्वेक्षण केले. त्यात आईवडील सोडून गेल्यावर त्यांच्या माघारी अनेक मुले शोषणाचे बळी पडतात, गुन्हेगारीकडे वळतात, शाळा सोडून भंगार वेचणे, कचरा गोळा करणे यासारख्या मार्गांना लागून आयुष्याचा कचरा करून बसतात. त्यांना रोखण्यासाठी व भवितव्य घडवण्याच्या उद्देशाने मयूरी यांनी सेवाश्रमाची निर्मिती केली. त्यासाठी गावाजवळच्या शांतिवन प्रकल्पाकडून त्यांनी प्रेरणा घेतली.

सेवाश्रमात ५० हून अधिक तमाशा कलावंतांच्या मुलांसाठी पाचवीपर्यंत निवासी शाळा आहे. स्वयंसेवकांची टीम आहे. मुलांच्या गरजांंची येथेच पूर्तता केली जाते. पालनपोषण, शिक्षण, संगोपन ते मुले स्वावलंबी होईपर्यंत संंस्था त्यांना साथ देते. त्यामुळेच येथील मुली सध्या नर्सिंगचे शिक्षण घेत आहेत. एक मुलगा शिक्षणशास्त्रातील पदविकेचा अभ्यास करत आहे. एक पहिल्या वर्षाला आहे. दोघे व्यावसायिक अभ्यासक्रमाला आहेत. ११वी-१२वी तर कितीतरी. शिक्षणाने या मुलांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आहे.

विशेष म्हणजे, शासनाच्या अनुदानाशिवाय हा प्रकल्प सुरू आहे. हे चालवताना अनेक सुविधांची कमतरता भासत असली तरी मयूरी यांनी सेवाश्रमाची सेवा अविरत सुरू ठेवली आहे. त्यांना गरज आहे समाजाच्या मदतीच्या हातांची.

बातम्या आणखी आहेत...