आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संस्कृत दिन:आधुनिक ज्ञानविज्ञानाचा मूळ स्राेत संस्कृत भाषेतच ; वसंतराव देशमुख यांचे प्रतिपादन

परळी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगाच्या पाठीवर संस्कृत ही दिव्योत्तम अशी सर्वश्रेष्ठ भाषा अखिल मानवांचे कल्याण साधणारी असून आधुनिक युगात विज्ञानाचे जे नवनवीन शोध लागत आहे. त्याचे मूळस्रोत संस्कृतभाषेत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते वसंतराव देशमुख यांनी केले.

परळी येथील आर्य समाजात सामूहिक स्वरूपात संस्कृत-दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून देशमुख बोलत होते. अध्यक्षस्थानी आर्य समाजाचे सचिव उग्रसेन राठौर होते तर व्यासपीठावर वैदिक विद्वान पं. रामनिवास गुणग्राहक, पं.उदयवीर आर्य, सोममुनी, आचार्य सत्येंद्र, जुगलकिशोर लोहिया यांची उपस्थिती होती.यावेळी देशमुख यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून आधुनिक युगात संस्कृतभाषेचा अभ्यासाचा अभाव होत चालल्याने आपण शाश्वत सुखापासून दुरावत चाललो आहोत. याबद्दल चिंता व्यक्त केली.ते म्हणाले, संस्कृतच्या अभ्यासाने माणूस शहाणा होतो व त्याबरोबर व्यवहाराचे ज्ञान देखील प्राप्त करतो. यासाठीच विद्यार्थी,शिक्षक व पालकांनी सर्वदृष्ट्या उन्नत होण्याकरिता संस्कृत भाषेतील ज्ञान-विज्ञानाचा व नैतिक मूल्यांचा अंगीकार करावा.

पं.रामनिवास गुणग्राहक यांनी आपल्या भाषणात संस्कृत ही भाषा आपल्यातील गुणवैशिष्ट्यांमुळे सर्व भाषांपेक्षा सरस असल्यामुळे आधुनिक वैज्ञानिक युगात तंत्रज्ञान व आत्मज्ञानाच्या निकोप वाढीसाठी अतिशय सर्वोत्तम आहे. म्हणूनच या भाषेचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली तर उदयवीर आर्य यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभक्तीचे महत्व विशद करणारे गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.वीरेंद्र शास्त्री यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.अरुण चव्हाण, अतुल नरवाडकर यांनी केले तर आभार रंगनाथ तिवारी यांनी मानले. या कार्यक्रमास लक्ष्मीनारायण लाहोटी, गोवर्धन चाटे, लक्ष्मणराव आर्य, प्रा.डाॅ.नयनकुमार आचार्य, रमाकांत निर्मळे, शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

अडीचशे विद्यार्थ्यांनी घेतला श्लोकगायन स्पर्धेत सहभाग
दोन दिवसांपूर्वी घेण्यात आलेल्या संस्कृत श्लोकगायन व भाषणस्पर्धेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना याच कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या दोन्ही स्पर्धेत शहरातील विविध शाळा - महाविद्यालयांच्या जवळपास अडीचशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या सर्व सहभागी विद्यार्थ्यांना दिवंगत नंदलालजी लाहोटी यांच्या स्मरणार्थ लाहोटी परिवाराच्या वतीने पुरस्कार व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. यासह मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले.

बातम्या आणखी आहेत...