आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रिमंडळ विस्तार:​​​​​​​मोदींनी पुन्हा मुंडेंना डावलले; बीड जिल्ह्यातून नाराजीचा सूर; मंत्रिपद देऊन ओबीसींची नाराजी दूर करण्याची संधी गमावल्याची चर्चा

बीडएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

ओबीसींचे नेतृत्व कायम राखण्यासाठी बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडेंना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी दिली जाईल, असे समीकरण असतानाच बुधवारी दुपारी चित्र पालटले. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीच खासदार मुंडे यांचे नाव अचानक बाजूला पडले. लोकनेते गोपीनाथ मुंडेंंच्या निधनानंतर तब्बल सात वर्षांनंतर त्यांच्याच लेकीला केंद्रीय मंत्रिमंडळात मिळणारी संधी हुकली आहे. हा धक्का मुंडेंना नव्हे, तर बीड जिल्ह्याला बसला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा मुंडेंना डावलल्याची चर्चा जिल्ह्यात आहे.

२०१४ मध्ये खासदार झालेले गोपीनाथ मुंडे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात ग्रामविकास मंत्रिपदाची शपथ घेतल्याने बीड जिल्ह्याच्या विकासाचे स्वप्न पूर्ण होणार होते. परंतु, ३ जून २०१४ रोजी अपघातात गोपीनाथ मुंडेंचे निधन झाले आणि बीड जिल्हा शोकाकुल झाला. पुढे लोकसभा पोटनिवडणुकीत त्यांची कन्या डॉ. प्रीतम या खासदार झाल्या. या वेळी मुंडे साहेबांचे जिल्ह्याच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान मोदी हे डाॅ. प्रीतम यांना केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लावून गोपीनाथ मुंडंेचे विकासाचे स्वप्न पूर्ण करतील, अशी आशा जिल्ह्याला होती. परंतु पदरी निराशाच पडली. २०१९ च्या निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघात भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा पराभव झाला.

पंकजांंना पराभूत करण्यासाठी राज्यातील भाजपच्याच काही नेत्यांनी परळीत रसद पुरवल्याचा आरोप आजही केला जातो. पंकजा या विधानसभेच्या रणांगणात पराभूत झाल्या असल्या तरी त्या एक मास लीडर असून ओबीसी नेत्या आहेत. त्यामुळे भाजप त्यांचे पुनर्वसन करेल अशी आशा जिल्ह्याला होती. परंतु, पंकजांना सुरुवातीला विधान परिषद, त्यानंतर राज्यसभेवरही डावलले. औरंगाबादचे डाॅ. भागवत कराड यांना भाजपने खासदार म्हणून संधी देत पक्ष ओबीसींच्या पाठीशी असल्याचे चित्र भासवले. विधानसभेच्या पराभवानंतर पंकजा मुंडे महाराष्ट्रात सक्रिय राहू नयेत म्हणून दीड वर्षानंतर भाजपने त्यांची राष्ट्रीय सचिवपदी निवड करत त्यांना राष्ट्रीय राजकारणात सक्रिय केले.

मंत्रिपद देऊन ओबीसींची नाराजी दूर करण्याची संधी गमावल्याची चर्चा
डॉ. प्रीतम मुंडे या ओबीसींचा आश्वासक महिला चेहरा असून त्या उच्चशिक्षित आहेत. ओबीसींची व्होट बँकही त्यांच्याकडे आहे. सध्या एकीकडे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झालेले आहे. अशा परिस्थितीत ओबीसींची नाराजी दूर करण्यासाठी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्री करण्याची भाजपला ही चांगली संधी होती, आता तीही पक्षाने गमावली असल्याची चर्चा सध्या रंगत आहे.

बातम्या आणखी आहेत...