आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंडे पॉझिटिव्ह:पतीने सोन्याचे लॉकेट विकून भरली फी, आता सिंधू कराड झाल्या फौजदार

परळीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पतीच्या हिमतीने इंजेगावच्या सुनेची यशाला गवसणी

खडतर परिस्थिती असतानाही पतीने जवळचे साेन्याचे लॉकेट विकून पत्नीकरिता स्पर्धा परीक्षेसाठीचे ४० हजार रुपये शुल्क भरले. पतीने अापल्यासाठी पाहिलेल्या स्वप्नाचेही तिने पाेलिस दलात फाैजदार हाेऊन चिज केले. ही जिद्द अाणि प्रेरणादायी गोष्ट प्रत्यक्षात उतरवून दाखवली अाहे तालुक्यातील इंजेगावचे अजय व सिंधू कराड या दांम्पत्याने. अजय व सिंधू कराड हे दोघे पती-पत्नी पुणे येथे २०१४ साली स्पर्धा परीक्षेची तयारी करत हाेते. दरम्यान, स्पर्धा परीक्षेसाठी पात्रतेची वयोमर्यादा संपल्यामुळे अजय कराड यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सोडली अाणि मेडिकल डिप्लोमा केला. परंतु, पत्नीला पाेलिस दलात अधिकारी करण्याचे त्यांचे स्वप्न हाेेते. त्यांनी आपल्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट विकून ४० हजार रुपये पत्नीच्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी भरले. पत्नी सिंधू यांनीही जिद्द अाणि चिकाटीने राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बाजी मारली. नाशिक येथील अकॅडमीत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर अाता त्या नवी मुंबई येथे पोलिस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाल्या आहेत.

सिंधू कराड यांचे प्राथमिक शिक्षण बेलापूर नवी मुंबई येथे झाले. तर उच्च माध्यमिक शिक्षण बडवणी (ता. गंगाखेड) आणि महाविद्यालयीन शिक्षण अंबाजोगाई व परळीत झाले. २०१६ साली त्यांनी पोलिस उपनिरीक्षक पदासाठी परीक्षा दिली होती. परंतु, समांतर आरक्षणाच्या मुद्द्यांवरून त्या परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला नव्हता. यासंदर्भात रोहिणी सोनवलकर यांच्यासह अनेकांनी प्रशासकीय व न्यायालयीन पातळीवर प्रयत्न केले. यात त्यांना यश आले. या परीक्षेचा निकाल उमेदवारांच्या बाजूने लागला. यात सिंधू यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली. इंजेगावातील सुनेने जिद्द व चिकाटीने मेहनत करत हे यश संपादन केले. या यशात पती अजय यांची त्यांना चांगली साथ मिळाली.

पत्नीच्या यशासाठी पती अजयने दिली अतुलनीय साथ

महात्मा फुले यांनी सावित्रीबाई यांना शिकवले व शिकण्यास प्रेरित केले. त्याचप्रमाणे या आधुनिक पिढीला आदर्श ठरावा असे आदर्श उदाहरण अजय कराडने समोर ठेवले आहे. समाजातील अनेक संकटांना सामोरे जात व्यवस्थेचे विरुद्ध न्यायासाठी लढा उभा करणे अन् तो शेवटपर्यंत आत्मविश्वासाने लढणे सोपे नव्हतेच. पत्नीच्या यशासाठी अतुलनीय साथ देणारा अजय हा आदर्श पती ठरला अाहे.

पाच वेळ यशाने दिली होती हुलकावणी
अजय व सिंधू हे पती-पत्नी दोघेही साेबत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचे. २०१६ ची पीएसअायसाठी मुख्य परीक्षा दोघांनीही दिली. सिंधू यांना मुलाखतीसाठी न्यायालयाने न्याय दिला. परीक्षा देत असताना त्यांना पाच वेळ अपयश अाले. परंतु, शेवटी जिद्दीच्या जाेरावर सिंधू यांनी यशाला गवसणी घातलीच.

बातम्या आणखी आहेत...