आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोर्चा:बालविकास मंत्र्यांच्या कार्यालयावर मोर्चा; अंगणवाडी सेविका पदयात्रा काढून मंत्री ठाकूरांच्या कार्यालयावर जाणार

केज14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नेतृत्वात २० जून रोजी यवतमाळहून अमरावतीपर्यंत पदयात्रा काढून २५ जून रोजी महिला व बालविकास मंत्र्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. या पदयात्रेत तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संघाच्या तालुकाध्यक्षा इरफाना शेख यांनी केले.

अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन शासकीय वेतन, भत्ते द्यावे, सरकारने २०१७ पासून महागाईचा विचार करून मानधनात वाढ केली नाही. त्यामुळे त्यांना शासकीय सेवेत कायम करेपर्यंत त्यांचे पगार महागाई निर्देशांकाशी जोडून तत्काळ भरीव स्वरूपाची मानधनात वाढ करावी, सेविका व मदतनीस यांना सेवानिवृत्तीनंतर मानधनाच्या अर्धी रक्कम ही दरमहा पेन्शन द्यावी, ऑनलाइन माहिती भरण्यासाठी नवीन मोबाइल देऊन योजनेच्या कामात सुलभता आणण्यासाठी मातृभाषेत पोषण ट्रॅकर ॲप व नवीन दरानुसार अंगणवाडी सेविकांना सिम रिचार्जची आगाऊ रक्कम द्यावी, महागाईमुळे पूरक पोषण आहाराची रक्कम तिपटीने वाढवावी या मागण्यांसाठी अनेक वेळा निवेदने व मोर्चे काढूनही शासनाने पोकळ आश्वासनावर बोळवण केली.

त्यामुळे २० जून रोजी यवतमाळहून राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली राज्यातील सेविका व मदतनीस यांची पदयात्रा काढून २५ जून रोजी अमरावती येथील महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.या पदयात्रेत तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संघाच्या जिल्हा उपाध्यक्षा अनुसया वायबसे, तालुकाध्यक्षा इरफाना शेख, जिल्हा सचिव सिंधू घोळवे, मीरा नेहरकर यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...