आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाजलगाव तालुक्यातील महातपुरी येथे बेसुमार वाळू उपशामुळे गोदावरी पात्रात झालेल्या खड्ड्यात १२ वर्षीय मुलगी पाय घसरून पडली. तिला वाचवताना तिची २० वर्षीय मावस बहीणही पात्रात गेली अन् दोघींचा बुडूून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (३ जून) सकाळी ९ वाजता घडली. दोघीही उन्हाळ्याच्या सुटीत त्यांच्या मावशीकडे महातपुरी येथे आल्या होत्या. स्वाती अरुण चव्हाण (१२, रा. आनंदवाडी, ता. परतूर, जि.जालना) व दीपाली गंगाधर बरवडे (२०, रा. मन्यारवाडी, ता. गेवराई) अशी दोन्ही बहिणींची नावे आहेत.
स्वाती व दीपाली या दोघी १५ दिवसांपूर्वी त्यांचे काका सोमेश्वर रामभाऊ शिंगाडे यांच्याकडे आल्या होत्या. शुक्रवारी महातपुरी गावालगत असलेल्या गोदावरी नदीच्या पात्रात मावशीसोबत कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. या ठिकाणी नदीपात्रात वाळूमाफियांनी वाळू उपशासाठी गोदावरी पात्रात रस्ताच केला आहे. याच रस्त्यावरून त्या दोघी बहिणी चालत होत्या. तितक्यात पाय घसरून स्वाती पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी दीपाली गेली. पाण्यात घाबरलेल्या स्वातीने दीपालीच्या गळ्याला घट्ट मिठी मारली. त्यामुळे दीपालीला कसलीच हालचाल करता आली नाही. दोघींचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. गोदावरी पात्रातील अन्य महिलांनी आरडाओरड केली. मात्र दोघी पाण्याच्या तळाला जाऊन बसल्या. याची माहिती मिळताच अनेकांनी पाण्यात उडी घेऊन त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच वेळाने सापडल्या. माजलगाव ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर वैद्यकीय अधिकारी गजानन रुद्रवार यांनी त्यांना मृत घोषित केले.
वाळू उपशामुळे एकट्या गेवराई तालुक्यात ९ मृत्यू
गेवराई | माफियांनी बेसुमार वाळूचा उपसा केल्याने नदीपात्रात मोठमोठे खड्डे झाले आहेत. अशाच खड्ड्यांत पडून लहान मुलांसह अनेकांचा जीव गेला आहे. गेवराई तालुक्यात मागील काही महिन्यांमध्ये बुडून मृत्यू झाल्याच्या तीन ते चार घटना घडल्या आहेत. यात शहाजनपूर येथील वाळू उपसा करून झालेल्या नदीपात्रातील खड्ड्यात पडून चार बालकांचा बुडून मृत्यू झाला होता.
याच तालुक्यात संगम जळगाव येथील गोदावरीच्या पात्रात धुणे धुण्यासाठी गेलेल्या नागरे नावाच्या महिलेचा मुलगा गोदावरीच्या खड्ड्यात पडला असता आईने पात्रात उडी घेतली पण आई आणि मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. तिसऱ्या घटनेत मिरगाव येथे कपडे धुण्यासाठी गेलेल्या आई, मुलगी, पुतणी यांचा गोदावरीच्या पात्रातील खड्ड्यात बुडून मृत्यू झाला होता. दरम्यान, वाळू माफियांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
बीएस्सीत शिकत होती दीपाली
दीपाली गंगाधर बरवडे ही माजलगाव येथील सुंदरराव सोळंके महाविद्यालयात बीएस्सी वर्गात शिक्षण घेत होती. महातपुरी गोदावरीच्या पात्रात वाळूमाफियांनी अनधिकृतपणे वाळूचे खड्डे खोदले असल्याने दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.