आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्वासन:नगरपालिकेचा पेठ बीडसाठी पहिल्या विभागीय कार्यालयाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवणार; सीओ ढाकणे यांनी नागरिकांना दिले आश्वासन

बीड12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेठ बीड भागात एकूण १० प्रभाग असून २० नगरसेवक आहेत. मोठी लोकसंख्या असलेला विस्तारित मोठा भाग आहे. पेठ बीड भागात नगरपालिकेचे विभागीय कार्यालय व्हावे, अशी मागणी नागरिकांच्या वतीने राणा रणजितसिंह चौहान यांनी केली. पालिका प्रशासनाकडून शहरातील पहिल्या विभागीय कार्यालयाचा विस्तारित प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवून पाठपुरावा केला जाईल, असे अश्वासन मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी दिले. प्रभाग क्रमांक पाचमधून ‘दिव्य मराठी’च्या ‘रूबरू’ या अभिनव उपक्रमास प्रारंभ झाला आहे.

शहरातील प्रभाग क्र. ५मधील भगवान जिव्हेश्वर मंदिरात दिव्य मराठीच्या वतीने रविवारी (१९ जून) ‘रूबरू : गोष्ट तुमची अन‌् तुमच्या वॉर्डाची’ हा विशेष उपक्रम राबवला अध्यक्षस्थानी मुख्याधिकारी उमेश ढाकणे होते, तर नगरसेविका मीना रणजितसिंह चौहान, नगरसेवक सम्राट चौहान, युवा नेता राणा चौहान, ज्येष्ठ नेते जयसिंग चुंगडे, स्वच्छता निरीक्षक भारत चांदणे, विद्युत विभागप्रमुख दत्ता व्यवहारे, पाणीपुरवठा सुपरवायझर अमोल बागलाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्याधिकारी ढाकणे म्हणाले, दिव्य मराठीने राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक आहे. बऱ्याच जणांना आमच्याशी थेट संवाद साधता येत नाही. रुबरूने ही संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार. नगरसेवकांनी मांडलेल्या समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू. माउली चौक ते हिरालाल चौक या रस्त्याचे काम मंजूर झाले, मात्र गुत्तेदारामुळे ते राहिले आहे. यात काय अडचण आहे जाणून घेऊन हे काम तत्काळ सुरू करण्यात येइल. तसेच या भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

त्यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. पालिकेच्या वतीने आराखडा तयार केला जात आहे. निविदेचे कामही लवकरच मार्गी लावून हा प्रश्न सुटेल. शहरात बऱ्याच ठिकाणी कचरा पडलेला दिसतो. अस्वच्छतेचा विषय आहेच. मुख्याधिकारी पदाचा पदभार घेतल्यापासून जास्त स्वच्छतेवर लक्ष आहे. मनुष्यबळ व शहराची व्याप्ती पाहता घंटागाड्या पुरेशा प्रमाणात नाहीत. उपलब्ध यंत्रणेचा वापर करत स्वच्छतेचे नियोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात कै. रणजितसिंह चौहान यांना आदरांजली अर्पण करून झाली. दिव्य मराठीचे ब्युरो चीफ दिनेश लिंबेकर यांनी प्रास्ताविक केले. सिटी रिपोर्टर रवी उबाळे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी उपसंपादक अनंत वैद्य, जाहिरात प्रतिनिधी गणेश सावंत, वसुली प्रतिनिधी प्रशांत बीडकर, छायाचित्रकार आमेर हुसेन आदी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार सिटी रिपोर्टर अमोल मुळे यांनी मानले. या वेळी प्रभागातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...