आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजलगाव:पैशाच्या कारणावरून मित्राचा खून; तिघांवर खुनाचा गुन्हा, एक अटकेत

माजलगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैसे व जुन्या भांडणातून दोघांत बाचाबाची झाली तेव्हा एकाने त्याच्या भावासह अन्य दुसऱ्या मित्रास बोलावून घेतले. तेव्हा भागवत अशोक आगे या तरुणाला तिघांनी चाकू व दगडाने जबर मारहाण केल्याची घटना मंगळवारी माजलगाव शहरातील नवीन बसस्थानकाच्या शौचालय परिसरात घडली. अखेर मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या भागवतचा बीडमध्ये उपचार सुरू असताना तिसऱ्या दिवशी शुक्रवारी मृत्यू झाला. या प्रकरणी भागवतच्या भावाच्या तक्रारीवरून माजलगाव शहर पोलिसांत तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी यातील मुख्य आरोपीस अटक केली आहे.

माजलगाव येथील भागवत अशोक आगे व महेश अशोक सोळंके हे दोघे मित्र होते. २३ मार्च २०२१ रोजी दोघांनी एकत्र जेवण केले. त्यानंतर दोघे शहरातील नवीन बसस्थानकात असलेल्या शौचालय परिसरात एका ठिकाणी बसले. या ठिकाणी पैशाच्या कारणावरून दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. याच वेळी महेश सोळंके याने त्याचा भाऊ आणि मित्रास त्या ठिकाणी बोलावून घेतले. महेश सोळंके, मारुती सोळंके व अशोक सावंत या तिघांनी मिळून भागवत आगे यास चाकू व दगडाने जबर मारहाण केली. या मारहाणीत भागवत याचे डोके व गुप्तांगावर गंभीर इजा झाल्याने त्याला उपचारासाठी माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर डाॅक्टरांनी प्राथमिक उपचार करून भागवत याला पुढील उपचारासाठी बीडला पाठवले. परंतु उपचारादरम्यान शुक्रवारी त्याचा बीडमध्ये मृत्यू झाला. याप्रकरणी मृत भागवत याचा भाऊ विजय आगे यांनी माजलगाव शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून महेश अशोक सोळंके, मारुती अशोक सोळंके (दोघे रा. फुलेनगर, माजलगाव) व अशोक सावंत ( रा. शिवाजीनगर, माजलगाव) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

एकास पोलिस कोठडी, दोघे फरार
तपासी अधिकारी धनंजय फराटे यांनी भागवत आगेच्या खुनातील मुख्य आरोपी महेश सोळंके यास शुक्रवारीच ताब्यात घेत शनिवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्याला माजलगाव न्यायालयाने ३१ मार्च २०२१ पर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी दोन आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...