आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी आत्‍महत्‍या:माझा ऊस गेला रे...असे सांगत गेवराईच्या शेतकऱ्याने दोन एकर ऊस पेटवून दिला, नंतर घेतला गळफास

गेवराई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
उसाला पेटवून नामदेव यांनी याच झाडावर गळफास घेतला. मृतदेह उतरवल्यानंतर गळ्यातील उपरणे मात्र झाडावर असे लटकत होते. - Divya Marathi
उसाला पेटवून नामदेव यांनी याच झाडावर गळफास घेतला. मृतदेह उतरवल्यानंतर गळ्यातील उपरणे मात्र झाडावर असे लटकत होते.

पावसाळा तोंडावर आला तरी साखर कारखान्याकडून शेतातील उभा ऊस नेला जात नाही म्हणून गेवराई तालुक्यातील हिंगणगावातील संतप्त शेतकऱ्याने बुधवारी दुपारी १२.३० वाजता २ एकरांवरील ऊस पेटवून दिला व स्वत: लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. गळफास घेण्याआधी शेतकऱ्याने त्याच्या मामेभावाला फोन करून आक्रोश करत “माझा ऊस गेला...वर दोरी टाकलीय, फाशी घेतोय आता...’ असे सांगत जीवन संपवले. नामदेव आसाराम जाधव (३५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

शेतकरी नामदेव यांना चार एकर शेती आहे. त्यातील दोन एकरवर त्यांनी ऊस लावला. मागील वर्षी त्यांनी दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने आपला ऊस कारखान्यावर गाळपासाठी पाठवला होता. यंदा गेवराई तालुक्यासह जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. ११ मे रोजी नामदेव यांनी बागपिंपळगाव येथील मामाच्या मुलाला फोनवरून रडत रडत मी आत्महत्या करत असल्याचे सांगितले. दरम्यान, मामाच्या मुलाने तत्काळ ही माहिती हिंगणगाव येथील त्यांच्या मित्रांना दिली. मित्रांनी शेतात जाऊन ज्या लिंबाच्या झाडाजवळ फोन लावला तेथेच नामदेव जाधव हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. मृत नामदेव यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन भाऊ, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. जेमतेम असलेली शेती करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत होते. दरम्यान, घटनास्थळी बाळासाहेब मस्के यांनी भेट दिली. गेवराई पोलिस ठाण्याचे पोहेकाँ सरवदे यांनी पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन तो गेवराई उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात येणार होता.

मयत - नामदेव जाधव
मयत - नामदेव जाधव

त्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना मदत देणार
आत्महत्येच्या घटनेनंतर जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी नामदेव जाधव यांच्या कुटुबीयांची भेट घेतली व त्यानंतर पत्रकार परिषद घेत कुटुंबीयांना शासनातर्फे मदत करण्याचे आश्वासन दिले. जिल्ह्यात अतिरिक्त ऊस प्रश्न गंभीर असून दहा लाख मेट्रिक टन ऊस शिल्लक राहू शकेल, अशी भीतीदेखील जिल्हाधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. मात्र, शासनामार्फत शिल्लक ऊसासंदर्भात योग्य नियोजन केले जाईल, असेही ते म्हणाले.

बिगरनोंदीच्या ऊस गाळपाचे नियोजन
^नामदेव यांच्या आत्महत्येचा घटनेमुळे मी दु:खी झालो आहे. शेतकऱ्यांनी संयम राखणे गरजेचे असून कोणीही टोकाचे पाऊल उचलू नये. जयभवानी साखर कारखान्याकडून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला योग्य ती मदत केली जाईल. साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील नोंदीच्या उसाबरोबरच बिगरनोंदीचा ऊसही गाळप करण्याचे नियोजन केले आहे.
- अमरसिंह पंडित, चेअरमन, जयभवानी साखर कारखाना, गढी.

एक एकर उसाचे गाळप तीन दिवसांत होणार होते
हिंगणगाव येथे १०१ हेक्टर ८० आर क्षेत्रावरील उसाची नोंद जयभवानीकडे होती. नोंद असलेल्या सर्व उसाचे गाळप “जयभवानी’कडून करण्यात आले आहे. बिगरनोंदीच्या २५ हेक्टर क्षेत्रापैकी ३ शेतकऱ्यांचा केवळ २ हेक्टर ऊस गाळपाअभावी शिल्लक राहिला होता. यामधील ४० आर म्हणजे १ एकर ऊस शेतकरी नामदेव जाधव यांचा होता. पुढील दोन-तीन दिवसांत त्यांच्याही उसाचे गाळप गढी येथील जयभवानी साखर कारखाना करणार होता. मागील वर्षी गंगामाई शुगर्स या कारखान्याने त्यांच्या उसाचे गाळप केले होते. मात्र या वर्षी गंगामाई शुगर्सने त्यांचा ऊस गाळपासाठी घेतला नाही. या वर्षी अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला आहे.

बातम्या आणखी आहेत...