आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षण जनसंवाद:माझे आंदोलन समाजाच्या प्रश्नावर, कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही; खासदार संभाजीराजेंचा बीडमध्ये पत्रकारांशी संवाद

बीडएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गंगावाडी, चव्हानवाडी, गोविंदवाडी, पांढरी, मिरगावच्या मुलींनी पत्रे देत कळवल्या भावना

आरक्षणासाठी आता वटहुकूम काढणे व त्यानंतर घटनेत दुरुस्ती करणे हेच पर्याय आहेत. त्या दिशेने प्रयत्न करण्यासाठी आम्ही पंतप्रधानांना भेटू, त्यांना पत्र पाठवू. पंतप्रधान छत्रपतींचा आदर करतात. समाजाचा प्रश्न घेऊन आम्ही त्यांच्याकडे जाणार असून ते नक्कीच सकारात्मक भूमिका घेतील. माझे आंदोलन कुठल्याही पक्षाविरोधात नाही, समाजाच्या प्रश्नावर आहे, असे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तर गेवराई तालुक्यातील जनसंवाद दौऱ्यादरम्यान दुपारी ग्रामीण भागातील शेतकरी महिलांनी पुढील दौऱ्यासाठी मदत म्हणून एक दिवसाची रोजंदारी छत्रपती संभाजीराजेंकडे सुपूर्द केली.

मराठा आरक्षण जनसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने खासदार छत्रपती संभाजीराजे बीड येथे आले असता शनिवारी सकाळी येथील शासकीय विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. संभाजीराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराजांचे आम्ही वारस असून त्यांचे धोरण सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारे होते, आमचीही तीच भूमिका आहे. कोणत्याही समाजावर अन्याय झाला तर त्या विरोधात लढण्यासाठी आम्ही उभे राहू. मराठा समाजाला आरक्षणाची गरज अाहे. मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या मराठा समाजाला प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची आवश्यकता आहे. माझे आंदोलन कोणत्याही पक्षाविरोधात नाही. केंद्राने आणि राज्याने त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या विषयांवर तातडीने कार्यवाही करायला हवी. राज्य सरकारने काही उपाययोजनांसाठी वेळ मागितला, त्यामुळे आम्ही मूक आंदोलन स्थगित केले.

येत्या महिनाभरात राज्य सरकारकडे केलेल्या मागण्यांवर कार्यवाही होईल, असे आश्वासन दिल्याचे संभाजीराजेंनी सांगितले. मागील वर्षी मोर्चातून समाजाने आरक्षण प्रश्‍नाचे गांभीर्य शासनाच्या निदर्शनास आणून दिले. आताची वेळ मोर्चे काढण्याची नाही. कोरोनासारख्या गंभीर परिस्थितीत आपण मोर्चे काढण्याऐवजी आरक्षणाविषयी सखोल अभ्यास करून आपली भूमिका शासनासमोर मांडायला हवी. या प्रश्नावर समाजाची फसवणूक न करता सत्य परिस्थितीची माहिती त्यांना द्यावी, असे संभाजीराजेंनी सांगितले. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अशोक हिंगे, राजेंद्र मस्के, गंगाधर काळकुटे, विनोद चव्हाण, गणेश उगले, महेश धांडे, जयमल्हार बागल उपस्थित होते.

ओबीसी आरक्षणावर भूमिका स्पष्ट करणार
सध्या ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याचा प्रश्न समोर आला आहे. मी या प्रश्नावर अभ्यास करत आहे. लवकरच या बाबतही भूमिका स्पष्ट करणार आहे. कोणत्याही समाजावर अन्याय झाला तरी आम्ही लढण्यासाठी पुढे येऊ, असे संभाजीराजे म्हणाले. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या लढ्यात मी पाठीशी आहे. ओबीसी समाजाला दुखावून मी कोणतेही काम करू शकत नाही. जाती-विषमता दूर करण्यासाठी माझा लढा आहे, कुठल्याही जातीविरोधात किंवा कुठल्याही पक्षाविरोधात लढा नाही.

गंगावाडी, चव्हानवाडी, गोविंदवाडी, पांढरी, मिरगावच्या मुलींनी पत्रे देत कळवल्या भावना
गेवराई | खासदार छत्रपती संभाजीराजे गेवराई तालुक्यात मराठा आरक्षण जनसंवाद दौऱ्यावर शनिवारी होते. संभाजीराजे आल्याचे पाहून ग्रामीण भागातील शिवणकाम करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिला, शेतकरी, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांनी संभाजीराजेंना पुढील दौऱ्यासाठी मदत म्हणून एक दिवस शेतात काम करून जेवढी हजेरी मिळते तेवढी रक्कम भेट दिली. यावेळी पूजा मोरे, किस्किंदा कानगुडे, सीमा होंडे, अनिता शेळके, मीनाक्षी उढाण, अंजली जाधव, शालिनी जाधव, क्रांती गोगले, दीक्षा मोरे, वायाळ, खिसाडे आदी महिला उपस्थित होत्या.

कोरोना, राजकीय परिणामाची चिंता न करता खासदार छत्रपती संभाजीराजे आपल्या लेकराबाळांच्या आरक्षणासाठी झटत अाहेत. आम्ही आमच्या कष्टाने कमावलेले दोन पैसे देऊन या आरक्षणाच्या चळवळीत याेगदान देऊ इच्छितो, अशी भावना शेतकरी महिलांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी छत्रपती संभाजीराजेंनी देखील शेतकऱ्यांचे आशीर्वाद म्हणून ही रक्कम स्वीकारली. तर तालुक्यातील गंगावाडी, चव्हानवाडी, पांढरी, मिरगाव, गोविंदवाडी येथील शेतकऱ्यांच्या मुलींनी राजेंना पत्र देऊन आपल्या भावना कळवल्या.

राजर्षी शाहू महाराजही राजवाड्यात राहत होते
बीड येथील मराठा आरक्षण मोर्चावेळी शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी येथे कोणी राजवाड्यावाला नाही असे म्हटले होते. त्यावर खासदार संभाजीराजे म्हणाले, छत्रपती शाहू महाराजही राजवाड्यात राहत होते. असे असतानाही त्यांनी वंचितांना आरक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. आम्ही त्यांचे वारसदार असून तीच आमची भूमिका आहे.
मराठा आरक्षण चळवळीसाठी आपले योगदान म्हणून शेतकरी महिलांनी आपल्या एक दिवसाच्या रोजंदारीची कमाई खासदार संभाजीराजेंकडे दिली. गेवराईमध्ये महिलांनी संभाजीराजेंकडे सुपूर्द केली एक दिवसाची रोजंदारी

बातम्या आणखी आहेत...