आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतीक्षा संपली:नगर-आष्टी पॅसेंजर 23 सप्टेंबरला रेल्वेमंत्र्यांच्या उपस्थितीत धावणार

आष्टी22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नऊ महिन्यांपूर्वी डिसेंबर महिन्यात नगर-आष्टी रेल्वे मार्गाच्या चाचणीनंतर ३ फेब्रुवारीला प्रवासी रेल्वे सुरू करण्याचा ठरलेला पहिला मुहूर्त लांबणीवर पडला. त्यानंतर खुद्द रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ७ मे २०२२ रोजी रेल्वे सुरू करण्याचे जाहीर करूनही ती सुरू न झाल्याने दुसराही मुहूर्त टळला. शेवटी आता पाच महिने उलटल्यांनतर शुक्रवारी (२३ सप्टेंबर) आष्टी - नगर अशा ६१ किलोमीटर अंतरावर पहिली पॅसेंजर धावणार आहे. या वेळी रेल्वेमंत्री अश्विनकुमार, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, बीडच्या खासदार डॉ.प्रीतम मुंडे या उपस्थित राहणार आहेत.

नगर- बीड- परळी या रेल्वेमार्गाची एकूण लांबी २६१ किलोमीटर असून नगरपासून आष्टीपर्यंत ६७ किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाल्यावर सहा महिन्यांपूर्वी चाचणी पूर्ण झाली होती. परंतु प्रत्यक्षात प्रवासी रेल्वे कधी धावणार या प्रतीक्षेत आष्टीकर होते. माजी खासदार, लोकनेत्या केशरकाकू क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यामुळे १९९५ मध्ये या रेल्वेमार्गाला तत्त्वतः मंजुरी मिळाल्यानंतर काही काळ या मार्गाचे काम रखडले होते. त्यानंतर लोकनेते गोपीनाथ मुंडे यानी या मार्गासाठी पाठपुरावा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून रेल्वेसाठी भरीव निधीची तरतूद केली. पुढे राज्य सरकार व केंद्र सरकारने या मार्गाचा निम्मा निम्मा वाटा उचलला. सध्या हा प्रकल्प तीन हजार कोटींच्या घरात गेला आहे.

रेल्वेस्थानकांवर तिकीट काउंटरही लवकरच सुरू
आष्टी तालुक्यातील आष्टी, कडा, धानोरा, सोलापूरवाडी, लोणी या पाच व नगर जिल्ह्यातील नारायणडोह या एका स्थानकावर लवकरच तिकीटगृह सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुलभ होणार आहे. यामुळे प्रवाशांत उत्सुकता आहे.

नगर ते आष्टी मार्गावर सहा थांबे
अहमदनगर-आष्टी ६७ किलोमीटर अंतर असून यादरम्यान रेल्वेगाडी सहा ठिकाणी प्रवाशांची चढ-उतार करणार आहे. यामध्ये प्रथम नारायणडोह, लोणी, सोलापूरवाडी, धानोरा, कडा व आष्टी या रेल्वेस्थानकांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...