आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मने जुळली:पंकजांच्या पायरीचा दगड व्हायला मी तयार- धनंजय मुंडे; धनंजय व माझ्यात काहींनी लावालावी केली- पंकजा मुंडे

पाथर्डी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
संत भगवानबाबांनी सुरू केलेल्या ८९ व्या नारळी सप्ताहाची सांगता झाली आहे. या सोहळ्यात सहभागी झालेल्या पंकजा मुंडे. - Divya Marathi
संत भगवानबाबांनी सुरू केलेल्या ८९ व्या नारळी सप्ताहाची सांगता झाली आहे. या सोहळ्यात सहभागी झालेल्या पंकजा मुंडे.

पंकजा मुंडे यांच्याशी माझे वैर नाही, मात्र तिच्या जवळचे लोक चुकीचे आहेत, पंकजाने आपला अहंकार कमी करावा, असा सल्ला भगवानगडाचे महंत डॉ. नामदेवशास्त्री यांनी दिला. तर, कीर्तनाच्या मंचावर संतांनी राजकारण करू नये, मी मोठ्याने बोलले तर तो अहंकार आहे असे समजू नका. मी आजही स्वतःला गडाची पायरी आहे, असे मानत असल्याचे प्रत्युत्तर पंकजा मुंडे यांनी दिले, तर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनीसुद्धा पंकजा व मी एकच आहे. पंकजांच्या पायरीचा दगड व्हायला मी तयार असल्याचे सूतोवाच केले, तर नामदेवशास्त्री यांनी तीन वर्षांनंतर आपण गडाचे महंतपद सोडणार असल्याचे जाहीर केले.

तालुक्यातील भारजवाडी येथील नारळी सप्ताहानिमित्त एकाच व्यासपीठावर आलेल्या भगवानगडाचे महंत डॉ. नामदेवशास्त्री व एकमेकांचे राजकीय विरोधक पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांनी केलेल्या राजकीय टीकाटिप्पणीमुळे राजकीय वर्तुळात हा धार्मिक कार्यक्रम चर्चेचा विषय ठरला. भगवानबाबांनी सुरू केलेल्या ८९ व्या नारळी सप्ताहाची सांगता मंगळवारी करण्यात आली. सुरुवातीला पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी भेट देत शुभेच्छा देताना या सप्ताहाचे आयोजन करण्याची संधी मला द्यावी, अशी विनंती नामदेवशास्त्री यांना करत ते जिल्ह्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी निघून गेले तर त्यानंतर व्यासपीठावर मुंडे बंधू, भगिनी यांच्यासह आमदार मोनिका राजळे, बाळासाहेब आजबे,माजी आमदार भीमराव धोंडे, प्रताप ढाकणे उपस्थित होते.

ढाकणे यांनी गडावरील बांधकामाला २१ लाखांची देणगी जाहीर केली. नामदेवशास्त्री म्हणाले, खूप दिवसानंतर पंकजा समोर बोलायची संधी मिळाली आहे. तिला मी मुलगी मानत असल्याने तिचा दुस्वास करू शकत नाही. तिने स्वाभिमान बाळगायला माझी हरकत नाही. भगवानबाबांना अनेकांनी फसवले होते. धनंजय मुंडेंची आई ही गडाची भक्त होती. या गडावर धनंजय मुंडे यांच्या गाडीवर दगडफेक झाली होती. मात्र आज याच गडावर चालू असलेल्या मंदिराच्या बांधकामाचे दगड देण्याचे भाग्य धनंजय मुंडे यांच्या नशिबी आले आहे. दहा एकर जमीन गडाला मिळावी म्हणून मी खूप प्रयत्न केले मात्र उपयोग झाला नाही. मात्र हे काम धनंजय मुंडे यांनी केले. भगवानबाबांच्या स्वप्नपूर्तीसाठी मी प्रयत्न करत आहे. दोन्ही भावंडांनी मोठी भरारी घ्यावी, अशी आपली इच्छा असल्याचे नामदेवशास्त्री म्हणाले. पंकजा म्हणाल्या, भगवानगड माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. महंतांच्या केसाला धक्का लागू नये ही माझी भावना आहे. येथून पुढे राजकारण याच गडावरून कर, असा सल्ला त्यांनी दिल्यानंतर मी हिरकणीसारखे भगवानगडावरून खाली आले. तुम्ही शिव्या जरी दिल्या तरी मी त्या फुलासारख्या मानेल.

आम्ही वेगळे झाल्याने आमदार झालो व मंत्री झालो : धनंजय
घरातील माणसांत संवाद असावा असे वाटत होते ते आज घडले आहे. माझ्यात व पंकजात सुईच्या टोका इतकेही मतभेद नाहीत. गडाच्या बाबतीत जी जबाबदारी असेल ती बहीण, भाऊ म्हणून आम्ही ती पार पाडू. माझी नियतीवर श्रद्धा आहे. जे घडले ते चांगले घडले. आम्ही राजकीयदृष्ट्या वेगळे झाल्याने दोघेही आमदार झालो व मंत्री झालो. एकत्र असतो तर असे घडले असते का, असे धनंजय मुंडे म्हणाले.

माझ्यावर काकू आणि आईचे संस्कार आहेत : पंकजा मुंडे
पंकजा मुंडे म्हणाल्या, धनंजय व माझ्यात काहींनी लावालावी केली ती मला माहिती नाही, मात्र माझ्यासाठी जनता महंत आहे. माझ्यावर माझी काकू व आईचे संस्कार आहेत. गडासाठी स्व. मुंडेंनी काय दिले ते आम्हाला कधी सांगितले नाही. मला गडाचे राजकारण करण्याची गरज नाही. सध्याचे सरकार चांगली मदत करत आहे. गडावरील कामासाठी मी गवंडीकाम करेन, असे मुंडे म्हणाल्या. महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली.