आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कष्टाळू कार्यकर्ते उपाशीच:घराणेशाहीत राष्ट्रवादी अव्वल; भाजप दुसऱ्या, शिवसेना तिसऱ्या स्थानी, तर काँग्रेस चौथ्या स्थानी

बीड / अमोल मुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय घराणेशाहीची चर्चा रंगली होती. आता मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणावर असलेले घराणेशाहीचे वर्चस्व कसे आहे याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यांमध्ये ४७% आमदार आणि ४८% खासदारांना घराणेशाहीचा वारसा आहे. तर, जिल्हा परिषदेचे ५३ टक्के अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि साखर कारखान्यांचे ५० टक्के चेअरमन हे घराणेशाहीशी संबंधित आहेत.राजकारणात सक्रिय होऊन एखादे पद मिळेल, आपणही आमदार, खासदार, झेडपीचा अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा साखर कारखान्याचा चेअरमन होऊ अशी आशा बाळगणाऱ्या तरुणांना राजकीय पक्षांमधील या घराणेशाहीने उपाशीच ठेवले आहे. दुसरीकडे राजकीय घराण्यांशी संबंधित व्यक्ती मात्र तुपाशी असल्याचे दिसत आहे.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी मराठवाडा व प. महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यांत ११६ विधानसभा, २० लोकसभा मतदारसंघ, १४ जि.प. व १९९ साखर कारखान्यांच्या अध्यक्षपदाच्या राजकीय स्थितीचा अभ्यास करून हा अहवाल प्रसिद्ध केला. विशेष म्हणजे, कधीकाळी काँग्रेस, राष्ट्रवादीवर घराणेशाहीचा आरोप करणारे भाजप व शिवसेनाही मागे नाहीत. चारही प्रकारात राष्ट्रवादी पहिल्या, भाजप दुसऱ्या, शिवसेना तिसऱ्या तर काँग्रेस चौथ्या स्थानी आहे. आमदार, खासदार, जि.प., कारखाना अशा ठिकाणी राष्ट्रवादीने ७७, भाजपने ७४, शिवसेनेने २९ तर काँग्रेसने २८ पदे दिली आहेत.

विधानसभा : ९४ उमेदवार घराणेशाहीतूनच १४ जिल्ह्यांतील ११६ विधानसभा मतदारसंघांत २०१९ मध्ये एकूण ९४ उमेदवार हे घराणेशाहीतून आलेले होते. त्यांना काही ना काही राजकीय पार्श्वभूमी होती. यापैकी ५४ उमेदवार विजयी झाले. तर, ४० पराभूत झाले.एकूण उमेदवारांत भाजपने २५, राष्ट्रवादीने ३५, काँग्रेसने १९ तर शिवसनेने १४ उमेदवार अशाच घराणेशाहीतून दिलेले होते.

लोकसभेच्या २० मतदारसंघांत १९ जण मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील २० लोकसभा मतदारसंघांत घराणेशाहीची पार्श्वभूमी असलेले १९ उमेदवार लढले होते. यापैकी ९ जण विजयी झाले. १० जणांना मात्र पराभव पत्करावा लागला. या उमेदवारांमध्ये भाजपने दिलेले ५, शिवसेनेचे ४, काँग्रेस पक्षाचे २ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ७ उमेदवार होते.

झेडपीवरही घरणाशाहीचेच वर्चस्व १४ जिल्ह्यांतील जि.प.च्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदांवरही घराणेशाहीचे वर्चस्व कायम होते. आता काही जि.प.ची मुदत संपली आहेत. मात्र, अहवालानुसार २८ पैकी १५ पदे घराणेशाहीला दिली. यात, भाजप ५, सेना ३, काँग्रेस १ व राष्ट्रवादीने ६ जणांना हे पद दिले आहे.

सामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो,तर राजकारण्याचा राजकारणी का नाही, असा युक्तिवाद होतो. पण डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होताना त्याला काही वर्षे डॉक्टरकीचा अभ्यास करावा लागतो. तसे राजकीय नेत्यांच्या मुलांना ग्राउंडपासून काम करावे लागत नाही. त्यांनीही ग्रामपंचायत ते लोकसभा असे टप्प्याने काम करावे. पण, अशा घराणेशाहीमुळे प्रामाणिक सामान्य कार्यकर्त्यांवर मात्र कायम अन्याय होतो. - हेरंब कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते, नगर

९९ साखर कारखाने ताब्यात मराठवाडा व प. महाराष्ट्रातील १९९ साखर कारखान्यांची माहिती कुलकर्णी यांनी जमा केली. यात ७० सहकारी साखर कारखाने आहेत. १२९ कारखाने खासगी. यापैकी ९९ कारखान्यांचे अध्यक्ष हे आमदार, खासदार किंवा तशा घराणेशाहीशी संबंधित. यात, भाजप ३९, शिवसेना ११, काँग्रेस १४ राष्ट्रवादी २९ व इतर ६ असे आहे.

राज्यात पवारांची तिसरी, अशोक चव्हाण-विलासराव देशमुख, भुजबळांची दुसरी पिढी {शरद पवारांची तिसरी पिढी {सांगलीत वसंतदादा {साताऱ्यात भोसले {सोलापुरात मोहितेंची तिसरी पिढी {सुशीलकुमार यांची दुसरी पिढी {नगरला विखेंची तिसरी पिढी {थोरात, राजळे, ढाकणे, गडाख, घुलेंची दुसरी पिढी {कोल्हापरात मंडलिक, महाडिक, माने यांची दुसरी पिढी {नाशिकला भुजबळांची दुसरी पिढी, हिरेंची तिसरी पिढी राजकारणात आहे. {जळगावात जैन यांची दुसरी {विदर्भात वसंतराव नाईकांची दुसरी पिढी {मराठवाड्यात अशोक चव्हाण, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे यांची दुसरी पिढी {कोकणात शेकापचे पाटील यांची तिसरी पिढी {नारायण राणेंची दुसरी पिढी {अमरावतीत पाटील यांची दुसरी पिढी {मुंबई-ठाण्यात गणेश नाईक, प्रकाश परांजपे यांची दुसरी पिढी {एकनाथ शिंदेंची दुसरी पिढी राजकारणात आहे.

बातम्या आणखी आहेत...