आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीत नाराजी?:माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्याकडून पर्यायाचा शोध सुरू; काही आमदारांना पाठविली 'केसीआर' यांच्या कामाची व्हिडिओ क्लिप

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदारासंघाचे आमदार प्रकाश सोळंके हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा गेली अनेक महिने मतदारसंघात सुरू आहे. धनंजय मुंडे यांच्यापेक्षा ज्येष्ठ असताना पक्षाने मंत्रिपदावर वर्णी न लावल्याने अनेकदा त्यांची पक्षावर असलेली नाराजी निदर्शनास आली होती. मात्र, आता केसीआर यांच्या विकासकामांच्या व्हिडिओ क्लिप काही आमदारांना पाठविल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

आमदार प्रकाश सोळंके यांच्या वक्तव्यामुळे आगामी काळात ते काही आमदारांसह वेगळी वाट चोखाळताय की काय अशी चर्चा बीडच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मी पक्षावर नाराज नसलो तरी वेगळ्या पर्यायाचा शोध सुरू केल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याने बीडमध्ये देखील केसीआर यांना मोठा पाठिंबा मिळणार असे दिसून येत आहे. सोळंके काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की, मतदार म्हणत असतील तर भाजपात काय मी शिंदे गटात देखील जाऊ शकतो. काय निर्णय घ्यायचा तो मतदारांना विश्वासात घेत घेईल.

फडणवीस, गडकरी यांच्यासोबत झळकले फोटो

साेळंके‎ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह विविध‎ कामाबाबत चर्चा करतानाचे फोटो सोशल मिडियावर झळकले, त्यामुळे मतदार‎संघात सध्या सोळंके हे भाजपमध्ये जाणार की केसीआर यांच्या बीआरएसमध्ये अशी चर्चा सुरू आहे.‎

कोण आहेत प्रकाश सोळंके?

प्रकाश सोळंके यांनी 2019 च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार रमेश आडसकर यांचा 12,890 मतांनी पराभव केला होता. यावेळी त्यांनी ही माझी शेवटची निवडणूक आहे असा प्रचार केला होता. ते लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक तथा मराठवाडा शिक्षण प्रचारक मंडळाचे अध्यक्ष आहेत. बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदारसंघावर सोळंके कुटुंबियांचे 1978 पासून वर्चस्व आहे. 1978 मध्ये प्रकाश सोळंके यांचे वडील सुंदरराव सोळंके यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून देखील राज्याचे काम पाहिले आहे. यानंतर 1999, 2004, 2009 सलग 3 वेळा प्रकाश सोळंके यांनी माजलगाव मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. 2014 चा अपवाद सोडला तर 2019 मध्ये पुन्हा त्यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला आहे.

आमदार प्रकाश सोळंके हे यांचा मराठवाड्यातील सहकार क्षेत्रात चांगला प्रभाव आहे. गेली काही दिवस मात्र, ते पक्षावर नाराज असल्याचे दिसून येत आहे. मराठवाड्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात त्यांची पकड चांगली असल्याने त्यांच्या नाराजीच्या चर्चांमुळे मात्र मराठवाड्यातील पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचे चित्र पालटू शकते अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.​​​