आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्माला ज्ञानाची जोड असणे गरजेचे असून आपण कर्म करतो याची जाण असणे गरजेचे आहे. पक्षी दोन पंखावर आकाशात भ्रमण करतो. तसे मानवाने कर्म व ज्ञानाच्या बळावर सुंदर असलेले जीवन जगणे आवश्यक आहे. ज्ञान हे कृतीतून अभिव्यक्त झाले पाहिजे. मानवी जन्माच्या धन्यतेत कर्म, ज्ञान, उपासनेला महत्त्व असून अनेकवेळा ज्ञानाने अहंकार निर्माण होतो. कर्म, ज्ञान, भक्तीसाठी भक्तीची गरज असून श्रद्धा असेल तरच ज्ञान निर्माण होते. ज्ञान हे समर्पण शिकवते तर कर्मात श्रद्धेला महत्त्व आहे.
जीवनाचे ध्येय निश्चित करण्यासाठी श्रीमद् भागवत श्रवण करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांनी केले. बीड येथील धुंडीराजशास्त्री पाटांगणकर नगरी येथे आयोजित श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञातील पहिले पुष्प अर्पण करताना ते बोलत होते. या कथेच्या निमित्ताने समितीच्या वतीने अमृताश्रमस्वामी महाराज, महादेव महाराज चाकरवाडीकर, कैवल्य महाराज, पद्मनाभ महाराज व्यास यांचे पूजन करण्यात आले.
समितीचे अध्यक्ष विनायक महाराज पाटांणकर, एकनाथ महाराज पुजारी, कार्याध्यक्ष दिलीप खिस्ती, अमोल शास्त्री जोशी, रामराजे राक्षसभूवनकर, श्रीनिवास कुलकर्णी, नवनाथ कुलकर्णी, विकास उमापूरकर, सतीश कुलकर्णी, चिन्मय पुजारी, जयंत पत्की उपस्थित होते. पुढे बोलताना चैतन्य महाराज म्हणाले, बीड येथील भागवतकथेच्या निमित्ताने वै. पाटांगणकर दादांच्या आठवणीने कंठ दाटून येतो. त्यांच्या साक्षीने बीड येथील श्रीमद् भागवत कथेची संकल्पना उदयास आली. श्रीमद् भागवत ग्रंथ हा संयम शिकवणारा ग्रंथ असून प्रपंचात उत्साह तर परमार्थात संयम आवश्यक आहे.
अविवेक अनेक आपत्तींना जन्म देतो तर विवेक संयम शिकवतो. विचाराशिवाय कोणतीही गोष्ट करणे व्यर्थ आहे. मनाच्या मागे विनाकारण पळू नये तर मनावर ताबा मिळवण्यासाठी श्रीमद् भागवत कथा श्रवण करणे गरजेचे असून श्रीमद् भागवत ग्रंथ भगवान श्रीकृष्णाच्या जीवन चरित्रावरील अनेक सुंदर कथा, प्रसंग, घटना या मनाला मोहक करणाऱ्या असून घटनात रमण्यापेक्षा ज्या कारणाने हे प्रसंग, घटना, व्यक्ती चरित्र निर्माण झाले त्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकण्यासाठी ही कथा आहे. साध्य हे व्यापक असावे, संत हे जन्मताच साध्य ठरवूनच जन्माला येतात. साध्य हे व्यापक असावे हे आपले भागवत ग्रंथ शिकवतो. आपल्याशी होणे हा गुन्हा नाहीतर ध्येय मोठे ठेवणे पुरुषांत आहे.
संकुचित ध्येय ठेवणे हा तर गुन्हा आहे. जगाला आदर्श शिकवणारे संत महात्मे याच भारत देशात जन्मले. मानवी देह हा दुर्लभ असून नर देह कर्तव्याने फुलून जातो त्यामुळे चांगली कर्म करा. जीवनाची ध्येय निश्चितीसाठी वारंवार श्रीमद् भागवत कथा श्रवणाची गरज असल्याचे त्यांनी कथेच्या शेवटी सांगितले. यावेळी मनोगत कैवल्य महाराज म्हणाले की श्रीमद् भागवत कथा श्रवणाने उपस्थित प्रत्येकाच्या मनामनात भगवंत वास करीत असतो. भाग्य असल्याशिवाय संतांचे दर्शन भागवत श्रवण होत नाही. श्रीमद् भागवत कोणाच्या मुखातून श्रवण करावे यालाही मोठे महत्त्व असून श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर ज्ञानसागर असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रज्ञा रामदासी यांनी केले तर उपस्थितांचे आभार समितीचे अध्यक्ष विनायक महाराज पाटांगणकर यांनी मानले. कथेच्या सांगतेला महाआरती करण्यात आली. याप्रसंगी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
शोभायात्रेने वेधले लक्ष कथा प्रारंभी सहयोग नगर भागातील श्री स्वामी समर्थ मंदिरापासून श्रीमद् भागवत ग्रंथाची शोभायात्रा काढण्यात आली. बंकट स्वामी मठाचे मठाधिपती लक्ष्मण महाराज मेंगडे यांनी या शोभायात्रेत सहभाग घेतला तर ठिकठिकाणी या शोभायात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात आली. या शोभायात्रेत बँडपथक, लेझीम पथक, अश्वधारी, टाळकरी मंडळी, कलशधारी महिला आदींनी सहभाग घेतला. रांगोळी रेखाटून शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.