आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआजच्या आधुनिक युगामध्ये शेतकऱ्यांनी अंधश्रद्धा, रूढी-परंपरेला झुगारले पाहिजे. आणि शेतीला वैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर शेतकऱ्यांनी नवनविन आधुनिक तंत्राचा वापर करणे गरजेचे असल्याचे मत माजी आमदार मोहनराव सोळंके यांनी व्यक्त केले.
माजलगाव शहरामध्ये दि. मराठवाडा अर्बन व मराठवाडा अॅग्रोटेक कंपनीच्या वतीने आयोजित मराठवाडा कृषी महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात शुक्रवारी (ता.६ मे) ते बोलत होते. उद्घाटक म्हणून आमदार प्रकाश सोळंके हे तर प्रमुख पाहुणे म्हणून सभापती अशोक डक, जय महेशचे गिरीश लोखंडे, संभाजी शेजुळ, अच्युत लाटे, चंद्रकांत शेजूळ, शेषेराव जगताप, उमेश मोगरेकर, तुकाराम येवले, चेअरमन सतिष सावंत, कल्याण आबुज, रवींद्र कानडे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना मोहनराव सोळंके म्हणाले की, ग्रामीण भागामध्ये रूढी-परंपरा, अंधश्रध्दा याचा अजगरी विळखा शेतकऱ्यांना पडला असून आता भविष्यात शेतकऱ्यांनी पैशांची बचत करून शेतीमध्ये गुंतवणूक करावी. श्रीमंत शेतकऱ्यांनी गरीब शेतकऱ्यांना सातत्याने मदतीचा ओघ परतीच्या हमीवर ठेवल्यास शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीची गरज भासणार नाही.
आजच्या युगात अंधश्रध्दामुक्त ग्रामीण महाराष्ट्र होणे काळाची गरज असल्याचे स्पष्ट मत मोहनराव सोळंके यांनी व्यक्त केले. आमदार प्रकाश सोळंके म्हणाले, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यास श्रमाची अडचण शेतीला पडणार नाही व या स्पर्धेच्या युगामध्ये शेतकरी सरकारच्या मदतीविना ताठ मानेने जगेल यात शंका नाही. या कृषी महोत्सवामध्ये मराठवाडा बँकेचे चेअरमन सतीश सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी अभ्यासपूर्वक असे कृषी प्रदर्शन भरविले असून या कृषी प्रदर्शनाचा जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहनही आमदार प्रकाश सोळंके यांनी केले. या वेळी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक, अच्युत लाटे, चंद्रकांत शेजूळ यांची समयोचित भाषणे झाली. प्रास्ताविक सतीश सावंत यांनी केले.
यशस्वी शेती हाच संकल्प युवकांनी करावा
आजच्या तरुणांनी आधुनिक शेती व्यवसाय म्हणून केल्यास अपयश निश्चितच थांबेल. यासह जोखीम स्वीकारत शेती यशस्वी करण्याचा निश्चय भविष्यात युवकांनी करावा, असे आमदार प्रकाश सोळंके यांनी यावेळी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.