आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धार्मिक:बोरगावात महादेवाच्या पिंडीच्या प्राणप्रतिष्ठेचा रात्रीचा मुहूर्त; गर्देश्वर मंदिराचा प्राणप्रतिष्ठा व कळसारोहण सोहळा उत्साहात

केज17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सप्ताहाच्या माध्यमातून ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. प्राणप्रतिष्ठा व कळसारोहण सोहळ्याचा मुहूर्त रात्री आठ वाजून २० मिनिटांनी होता. मंदिराच्या शिखरावर जाण्यासाठी अंधार असल्याने ग्रामस्थांनी क्रेनचा पर्याय शोधला व रात्री संत-महंतांच्या उपस्थितीत क्रेनच्या साहाय्याने बोरगावच्या गर्देश्वर महादेव मंदिराचे कळसारोहण करण्यात आले. ग्रामस्थांनी हा अनोखा क्षण डोळ्यात साठवून ठेवला.

केज तालुक्यातील बोरगाव बुद्रुक येथे परमपूज्य आनंदाश्रम स्वामी महाराज यांच्या आशीर्वादाने २ मे रोजी काशी निवासी श्री गणेशशास्त्री द्रविड, पांडुरंग महाराज क्षीरसागर, अनंतशास्त्री मुळे गोंदीकर, पाटील काका आळंदीकर यांच्या उपस्थितीत शिवप्रतिष्ठा व कळसारोहण महोत्सव पार पडला. बोरगाव येथील मारुती मंदिरानजीक असलेल्या गर्देश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. या ठिकाणी ग्रामस्थांनी नव्याने मंदिर उभारले. सोमवारी पहाटे पाच वाजता प्राणप्रतिष्ठा व कळसारोहण कार्यक्रमास प्रारंभ झाला. गणेश पूजन, स्वस्ती पुण्याहवाचन, देवस्थापना, अग्निस्थापना, शिवस्नान, प्रसाद संस्कार, आदिवासन, पुराणोक्त, मंत्रहोम व रात्री आठ ते नऊ या वेळेत महादेवाच्या पिंड व गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून मंदिरांचा जीर्णोद्धार
केज तालुक्यातील बोरगाव येथे वै.लक्ष्मणकाका क्षीरसागर यांचा २९ वर्षांपासून पुण्यतिथी सोहळा आयोजित केला जातो. यालाचा जोडून अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पार पडतो. अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून ग्रामस्थ लोकवर्गणीतून प्रत्येक वर्षी गावातील एका मंदिराचा जीर्णोद्धार करताहेत. आतापर्यंत गावातील खंडोबा मंदिर, मारुती मंदिर, कालिका देवी मंदिर अशा मंदिरांचा जीर्णोद्धार केल्याने गावात मंदिरांचा कायापालट होत आहे.

९ मे रोजी काल्याचे कीर्तन
हरिनाम सप्ताहास २ मेपासून प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी पंढरपूरचे गिरीश महाराजांचे कीर्तन झाले. सोमवारी ९ मे रोजी सकाळी ९ वाजता लक्ष्मण महाराज कोकाटे, कन्हेरी संस्थान, बारामती यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे. यासह ४ ते ६ भावार्थ रामायण पार पडेल. तसेच काकडा भजन, विष्णुसहस्रनाम, गाथा भजन, हरिपाठ व कीर्तने असे कार्यक्रम होतील.
क्रेनच्या साह्याने कळसारोहण : बोरगावातील गर्देश्वर महादेव मंदिराच्या कळसारोहणाचा मुहूर्त सोमवारी (२ मे) रात्री ८.२० मिनिटांनी हाेता. रात्री अंधारात मंदिराच्या शिखरावर जाणे शक्य नसल्याने कळसारोहणासाठी क्रेनची व्यवस्था केली होती. पांडुरंग महाराज क्षीरसागर, पाटील काका, अनंतशास्त्री मुळे यांच्या हस्ते कलश स्थापना करण्यात आली. या वेळी ग्रामस्थ उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...