आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलप्रदूषण टाळण्यासाठी पुढाकार:बियाणी डिजिटलच्या 400 ​​​​​​​ विद्यार्थ्यांसह नगर परिषद करणार निर्माल्य संकलन; निर्माल्यापासून खत तयार होणार

बीड17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाडक्या गणरायाला शुक्रवारी (ता.९ सप्टेंबर) जिल्हाभरात निरोप देण्यात येणार असून ठिकठिकाणी प्रशासनाच्या वतीने मिरवणुक व मूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. बीड शहरातील बियाणी डिजिटल स्मार्ट कोचिंगच्या वतीने चारशे विद्यार्थी प्रत्येकी दहा घरातून निर्माल्य संकलन करणार आहेत. या निर्माल्यापासून कृषिभूषण शिवराम घाेडके यांच्या मदतीने सेंद्रीय खत निर्मिती करून ते शेतकऱ्यांना मोफत देण्यात येणार आहे.

बीड नगर परिषदेच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे शहरातील कंकालेश्वर मंदिर परिसरातील विर्सजन विहिर व खंडेश्वरी परिसरातील विहिरीत मूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याठिकाणी नगर परिषदेच्या वतीने ट्रॅक्टर उभा करून कचरा संकलित करण्यात येणार आहे. या कचऱ्याचे नैसर्गिकरित्या विघटन करून खत निर्मितीसाठी पालिकेच्या वतीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. याचसोबत शहरातील येथील बियाणी डिजिटलच्या वतीने पाच वर्षांपासून सुरु केलेली परंपरा यंदाही जपत निर्माल्य संकलनाचा उपक्रम हाती घेतला. बियाणी डिजिटल स्मार्ट कोचिंगचे ४०० विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होणार असून एक विद्यार्थी दहा घरचे निर्माल्य संकलित करणार आहे. हे सर्व तिसरी ते दहावीचे आहेत. हे निर्माल्य बियाणी डिजिटलच्या वतीने संकलित करून कृषिभूषण शिवराम घोडकेंच्या प्रकल्पावर पाठवण्यात येणार आहे. याठिकाणी या निर्माल्यापासून सेंद्रीय खत तयार करून नेहमीप्रमाणे गरजू शेतकऱ्यांना मोफतपणे वितरित करण्यात येणार असल्याची माहिती बियाणी डिजिटलचे संचालक प्रवीण बियाणी यांनी दिली.

गणेश मंडळ घेणार पुढाकार
बीड, माजलगाव, गेवराई, केज, अंबाजोगाई, आष्टी, परळी शहरात यंदाही विविध गणेश मंडळांच्या वतीने विसर्जन मार्गावर भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांसह मंडळाचे स्वयंसेवकही तत्पर असणार आहेत.

पाच वर्षांपासून राबवतात उपक्रम
शालेय विद्यार्थ्यांपासून जर प्रदूषण रोखण्यासाठी पुढाकार घेतला गेला तर हे काम अधिक व्यापकपणे होऊ शकते. त्यामुळे बियाणी डिजिटलच्या वतीने चारशे विद्यार्थी प्रत्येक दहा घरी जाऊन निर्माल्य संकलित करणार आहेत. या निर्माल्याचा सेंद्रीय खत निर्मितीसाठी वापर होणार असून ते शेतकऱ्यांना मोफत वितरित करण्यात येणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून आम्ही हा उपक्रम राबवत असून याला मोठा प्रतिसाद लाभत आहे.'
प्रवीण बियाणी, संचालक, बियाणी डिजिटल स्मार्ट कोचिंग, बीड

बातम्या आणखी आहेत...