आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता प्रतीक्षा रेमडेसिवीरची:बीड जिल्ह्यात दोन दिवसांपासून इंजेक्शन मिळेना, एकट्या बीड शहरात आले तीनशे अर्ज, आज 96 इंजेक्शन येण्याची शक्यता

बीड11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाट बघुनी थकले डोळे... रेमडेसिविरसाठी काळीज वेडे; कंपन्याकडूनच पुरवठा नाही

कोरोनाशी झुंज देणाऱ्या रुग्णांना एकीकडे रेमडेसिविर इंजेक्शनची गरज असताना दुसरीकडे बीड जिल्ह्यात परिस्थिती बिकट होत चालली आहे. रविवार व सोमवार अशा दोन्ही दिवस जिल्ह्यात एकही इंजेक्शन उपलब्ध होऊ शकलेले नाहीत. बीड शहरात सोमवारी संध्याकाळपर्यंत एकूण ३०० अर्ज जिल्हा प्रशासनाकडे आले असताना तुटवड्यामुळे एकही इंजेक्शन मिळू शकलेले नाही. या इंजेक्शनसाठी नातेवाइकांच्या होणाऱ्या रांगा थांबवण्यासाठी खुद्द पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला सूचना देत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या, परंतु सोमवारी पहिल्याच दिवशी बीडसह अन्य दहा तालुक्यांत हे इंजेक्शन उपलब्ध होऊ शकले नाही. आता अन्न औषध निरीक्षकांनी मंगळवारी सकाळपर्यंत ९६ इंजेक्शन येतील, असे सांगितले आहे.

रेमडेसिविर इंजेक्शनसाठी बीडमधील रांगा आणी रुग्णांच्या नातेवाइकांची होणारी धावपळ थांबवण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला सूचना करत प्रत्येक तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना जर त्यांचे फिजिशियनकडून रेमडेसिविर इंजेक्शन देणे आवश्यक असल्याची शिफारस केली असेल तर अशांची यादी तयार करून ती यादी ईमेलवर जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवण्याचे आदेश जिल्ह्यातील तहसीलदारांना देण्यात आले. प्रत्येक तालुक्याचे तहसीलदार आणि मेडिकल सुपरिंटेंडेंट यांना सदरील इंजेक्शनचा पुरवठा करावा लागणार आहे. सोमवारपासून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हे इंजेक्शन ज्या त्या हॉस्पिटलमध्ये मिळणार असल्याचे सांगण्यात आले. कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाइकांनी प्रत्येक तहसील कार्यालयात इंजेक्शनच्या मागणीची नोंदही केली. परंतु दिवसभर एकही इंजेक्शन त्यांना मिळू शकले नाही. सोमवारी बीड शहरातही हीच परिस्थिती राहिली.

बीड शहरातून याच इंजेक्शनसाठी जवळपास तीनशे अर्ज आलेले असून सोमवारी कोणालाच इंजेक्शन मिळु शकले नाही. आम्ही बीड येथील औषध निरीक्षक रामेश्वर डोईफोडे यांच्याशी संपर्क साधून सोमवारी दिवसभर का इंजेक्शन येऊ शकले नाहीत याची माहिती घेतली असता त्यांनी सांगीतले की, तेव्हा सध्या कंपनीकडूनच डेपोला या इन्जेक्शनचा पुरवठा नसून डेपोकडून होलसेल विक्रेत्यांकडे इंजेक्शन आलेले नाहीत. त्यामुळे तुटवडा असून दररोज दीड हजार इंजेक्शनची मागणी असताना केवळ शंभर इंजेक्शन येत आहेत. बीड येथील खासगी मेडिकल व एजन्सीने कंपनीकडे १५ हजार रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी करून पैसेही पाठवले आहेत, परंतु हे इंजेक्शन तुटवड्याअभावी उपलब्ध झालेले नाहीत. मंगळवारी सकाळी ९६ इंजेक्शन उपलब्ध होतील. दिवसभरात एकूण दीडशे इंजेक्शन उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचे डोईफोडे यांनी सांगितले. त्यामुळे बीड जिल्ह्यातील नागरिकांना थोडा का होईना दिलासा मिळणार आहे.

नातेवाइकांच्या तहसील कार्यालयात चकरा
शिरूर : रेमडेसिविर इंजेक्शन सोमवारपासून तालुकास्तरावर वाटप होणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केल्याने सोमवारी येथील तहसील कार्यालयात रुग्णाच्या नातेवाइकांनी इंजेक्शनसाठी तहसील कार्यालयात येऊन चौकशी केली. परंतु त्यांना इंजेक्शन उपलब्ध होऊ शकले नाही. आतापर्यंत शिरूर येथील आयडियल कोविड सेंटरसाठी चार, तर ज्ञानसुधा हॉस्पिटलसाठी ६ इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आयडियलने नव्याने ९, तर ज्ञानसुधाने ७ इंजेक्शनची मागणी केली आहे.

तहसीलदारांकडून तीन शिक्षकांची नियुक्ती
वडवणी : येथील तहसीलदारांनी इंजेक्शनची नोंदणी व वितरणाची संपूर्ण माहिती अपडेट ठेवण्यासाठी शेख रफिक, शिवकुमार टिकुळे, दिनकर मुंडे या शिक्षकांची नियुक्ती केली आहे. इंजेक्शनची नोंद करून व किती इंजेक्शनची मागणी आली आहे. यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवून तेवढे इंजेक्शन मागवून ते वितरित करावे, तहसीलदार पाटील यांनी सांगितले.

परळीत २४ रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी
परळी : परळी तालुक्यात रेमडेसिविरचा तुटवडा होऊ नये, गरजू रुग्णांना वेळेवर हे इंजेक्शन मिळावे यासाठी तहसील कार्यालयात नोंदणी सुरू करण्यात आली. यासाठी ६ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज सोमवारी पहिल्या दिवशी साई हाॅस्पिटल ५, माउली हाॅस्पिटल १९ अशा २४ इंजेक्शनच्या मागणीसाठी नोंद करण्यात आली आहे.

पाटोद्यात दोन कर्मचाऱ्यांची नेमणूक
पाटोदा - येथील तहसील कार्यालयात इंजेक्शनसाठी नोंदणी सुरू झाली असून यासाठी दोन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती तहसीलदार रमेश मुनलोड यांनी दिली. सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत पाटोद्यात नोंदणीसाठी कोणीही आले नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. रेमडेसिविर इंजेक्शन मिळवण्यासाठी कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाइकांना बीड जिल्हा रुग्णालयातील औषध भांडाराच्या ठिकाणी अशा प्रकारे दिवस-दिवस ताटकळत बसावे लागत आहे.

दुपारपर्यंत नोंदणीसाठी कुणीच आले नाही
केज : तहसीलदार दुलाजी मेंडके यांनी रेमडेसिविर इंजेक्शनसाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू केली.तहसील कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात नोंदणी कक्ष स्थापन करण्यात आला. पंचायत समितीचे कृषी अधिकारी एस. डी. घुंबरे व विस्तार अधिकारी व्ही. व्ही. वरपे यांची तर नोंदणीची यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे मेलद्वारे पाठवण्यासाठी अव्वल कारकून जब्बार पठाण अशा तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सोमवारी दुपारपर्यंत केजमध्ये कोणीही नोंदणी केली नसल्याची माहिती जब्बार पठाण यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...