आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानिवडणुकीनंतर ६० दिवसांच्या मुदतीत निवडणुकीचा खर्च सादर न केल्या प्रकरणी सोनीजवळा (ता. केज) येथील सेवा सहकारी सोयायटीच्या निवडून आलेल्या चेअरमन, व्हाईस चेअरमनसह १३ संचालकांना अपात्र ठरविण्यात येत असल्याचा निकाल केजचे सहाय्यक निबंधक आर. एम. मोटे यांनी दिला आहे. तर ६ महिन्यांच्या आत पुन्हा निवडणूक घेण्याचे आदेश ही त्यांनी दिले आहेत. सोनीजवळा येथील सेवा सहकारी सोसायटीची २० फेब्रुवारी २०२२ रोजी १३ जागांसाठी निवडणूक झाली होती. निवडून आलेल्या संचालकांनी ६० दिवसांच्या मुदतीत खर्चाचा तपशील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करणे बंधनकारक होते. मात्र त्यांनी खर्चाचा तपशील सादर केला नाही. याबाबत अरुण करपे, आबासाहेब भांडवलकर, हुशेन पठाण, विलास ससाणे, गोवर्धन जोगदंड यांनी सहाय्यक निबंधकांकडे अपील दाखल केले होते.
सहाय्यक निबंधक कार्यालयात ३ वेळा सुनावणी घेण्यात आली. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर सहाय्यक निबंधक आर. एम. मोटे यांनी फिर्यादी पक्षाचे वकील अॅड. एन. पी. होळकर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून निवडणूक खर्च सादर न केल्याप्रकरणी सोसायटी चेअरमन सोपान ससाणे, व्हाइस चेअरमन अहेमद बालेखा पठाण, संचालक शिवाजी गायकवाड, सुभाष राऊत, भास्कर शेळके, सुधीर कोकाटे, नवनाथ ससाणे, जमील मोहमद हुसेन सुरेशी, सुनंदा सामसे, साहेबाबाई जोगदंड, उद्धव गिरी, पार्वती सूर्यवंशी, शालू भांडवलकर या संचालक मंडळास अपात्र ठरविले आहे.
निवडणूकीला अपात्र, प्रशासक नियुक्त अपात्र ठरविण्यात आलेल्या १३ संचालकांना ३ वर्षांपर्यंत कोणत्याही सहकारी संस्थेची निवडणूक लढवण्यास प्रतिबंध केला आहे. साेसायटीवर जिल्हा सहकारी बँकेच्या केज शाखेचे तपासणीस राजेश मुळे यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती ही केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.