आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियमांचे उल्लंघन:3 कोटी रुपयांचा दंड थकवणाऱ्या 77 हजार वाहनधारकांना नोटिसा

अमोल मुळे | बीड6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहतूक शाखेने ठोठावलेला दंड न भरणाऱ्या वाहनधारकांवर आता वाहतूक शाखेने कारवाई हाती घेतली आहे. मागील सुमारे साडेतीन वर्षांत वाहनधारकांनी तब्बल ३ कोटी ५ लाख ९८ हजार रुपयांचा दंड थकवला. दंड थकवणाऱ्या ७७ हजार वाहनधारकांना आता वाहतूक शाखेने नोटिसा बजावल्या आहेत. जिल्ह्यात अस्ताव्यस्त पार्किंग, हेल्मेटचा वापर नाही, वाहन चालवण्याचा परवाना नाही, दुचाकीवर ट्रिपल सीट बसवून प्रवास, चारचाकी वाहनांची कागदपत्रे नाहीत, वाहनाचा विमा नाही यासह अवैध प्रवासी वाहतूक अशा अनेक प्रकारे वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जाते.

जिल्ह्यात बीडसह प्रमुख सर्व शहरांत वाहतूक शाखेचे पोलिस अशा नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करतात. मागील काही वर्षांपासून ई-चलान ही प्रक्रिया सुरू झालेली असून वाहतूक पोलिसांच्या हाती असलेल्या मशीनच्या साह्याने संबंधित वाहनांवर ऑनलाइन दंड आकारला जातो. वाहनधारकांकडे पैसे नसतील किंवा त्याला कधीही कुठेही दंड भरणे सोपे जावे यासाठी ही पद्धत अवलंबली होती. अशा प्रकारे ऑनलाइन दंड अाकारल्यानंतर वाहन घेताना नोंदणीकृत केलेल्या मोबाइलवर त्याबाबतचा मेसेजही येतो. तपासणीत वाहन सापडल्यानंतर त्याच्यावरचा ऑनलाइन दंड तपासून तो वसूलही केला जातो.

दंड न भरणाऱ्या वाहनधारकांवर न्यायालयात खटलाही दाखल करण्याची तरतूद आहे. जिल्ह्यात सन २०१९ ते मे २०२२ या साडेतीन वर्षांत जिल्ह्यातील ७७ हजार ४३४ वाहनधारकांनी वाहतूक शाखेचा ३ कोटी ५ लाख ९८ हजारांचा दंड थकवला. १३ ऑगस्ट रोजी हाेणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीत या वाहनधारकांनी थकवलेला हा दंड भरून घ्यावा, यासाठी आता वाहतूक शाखेने प्रयत्न सुरू केलेत. यासाठी या सर्व वाहनधारकांना नोटीस बजावण्याल्याची माहिती जिल्हा वाहतूक शाखेने दिली.

गतवर्षी सर्वाधिक एक कोटी २८ लाख दंड थकीत
सन २०१९ मध्ये ५ हजार ५०१ वाहनधारकांनी १४ लाख ८९ हजार रुपयांचा दंड थकवला होता, तर २०२० मध्ये ३० हजार ४८४ वाहनधारकांनी ८१ लाख ११ हजार ९०० रुपयांचा दंड थकवला होता. गतवर्षी सन २०२१ मध्ये ३४ हजार ६२६ वाहनधारकांनी १ कोटी २८ लाख ९७ हजार ४५० रुपयांचा दंड थकवला. चालू वर्षी जानेवारी ते मे २०२२ या पाच महिन्यांच्या काळात ६ हजार ८२३ वाहनधारकांनी ८० लाख ९९ हजार ४५० रुपयांचा दंड थकवला. एकूण ७७ हजार ४३४ वाहनधारकांनी ३ कोटी ५ लाख ९८ हजार ६०० रुपयांचा दंड थकवला.

दंड भरणार नाहीत त्यांच्यावर खटले दाखल होणार
वाहतूक नियमांचे उल्लंघन केलेल्या वाहनधारकांना नोटिसा बजावलेल्या आहेत. जे वाहनधारक दंड भरणार नाहीत त्यांच्यावर खटले दाखल केले जातील. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया टाळण्यासाठी वाहनधारकांनी दंड भरावा. -कैलास भारती, सहायक पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, बीड.

मोबाइल नंबर अपडेटची अडचण
दंड थकवणाऱ्या काही वाहनधारकांचे मोबाइल क्रमांक हे अपडेट नाहीत. त्यामुळे त्यांना ऑनलाइन पद्धतीने नोटिसा बजावण्यात अडचणी आहेत. मात्र, त्या वाहनधारकांच्या पत्त्यांची माहिती काढून त्यांना नोटिसा बजावल्या जातील.

बातम्या आणखी आहेत...