आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:हिंसाचाराने पीडित महिलांकरिता आता सखी सेंटर चे कवचकुंडल; मान्यता समुपदेशन ते न्यायालयीन लढाईचे मार्गदर्शन मिळणार एकाच छताखाली

अमोल मुळे | बीड23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बलात्कार, सामाजिक अथवा काैटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर आता त्यांच्या मदतीला सखी केंद्र येणार आहे. समुपदेशन, गुन्हा नोंद, न्यायालयीन लढाई ते आवश्यकतेनुसार पुनर्वसनाचे काम एकाच छताखाली होणार आहे. ग्रामीण विकास मंडळाच्या वन स्टॉन सखी सेंंटरला मान्यता मिळाली. जिल्हा रुग्णालयात हे केंद्र सुरू झाल्याची माहिती ग्रामीण विकास मंडळाचे एस. बी. सय्यद यांनी दिली.

दुर्दैवाने महिलांना कुठल्याही सामाजिक किंवा कौटुंबीक हिंसाचाराला बळी पडावे लागले तर त्यांना उपचारासाठी दाखल केल्यानंतर समुपदेशनापासून ते न्यायालयीन लढाईपर्यंतचे सहकार्य व्हावे यासाठी २०१५ मध्ये केंद्र सरकारने महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात १ वन स्टॉप सखी केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले हाेते. महाराष्ट्रात याच्या अंमलबजावणीची सुरुवात २०१९ मध्ये झाली. दरम्यान, मागील ३ वर्षांत जिल्ह्यात हे केंद्र सुरू होऊ शकले नव्हते. बनसारोळा ग्रामीण विकास मंडळाने सखी केंद्रासाठी प्रस्ताव पाठवला होता.

११ सदस्यीय समितीने १ सप्टेंबर रोजी ग्रामीण विकास मंडळाला जिल्हा रुग्णालयात सखी केंद्र सुरू करण्यास परवानगी देत केंद्र कार्यान्वित करण्याचे आदेश दिले. व्यवस्थापन समिती बैठकीस जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, न्या. सिद्धार्थ गोडबोले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. आर. तडवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर मोकाटे आदी उपस्थित होते.

१४ कर्मचाऱ्यांची सखी केंद्रात केली नेमणूक
सखी केंद्रात ग्रामीण विकास मंडळाने १४ कर्मचाऱ्यांची नेमणूक केली. यात, शांता खांडेकर, प्रियंका भद्रे, दीपा घोळवे, अॅड. सारिका कुलकर्णी, अॅड पंडित विजय, सय्यद मजहर अली, अश्विनी शेप, अब्दुल कलाम, कविता नरवडे, शिवाजी भोंडवे, तौफिक शेख, मदिना शेख यांची नियुक्ती केली आहे.

कुठे झाले सेंटर सुरूॽ
बीड जिल्हा रुग्णालयात वन स्टॉप सखी सेंटर सुरू झाले.

महाराष्ट्रात कधीपासून अंमलबजावणीॽ
महाराष्ट्रात या योजनेच्या अंमलबजावणीची सुरुवात २०१९ मध्ये झाली.

शासनाकडे कुणी पाठवला हाेता प्रस्तावॽ
बनसारोळा येथील ग्रामीण विकास मंडळाने सखी केंद्र सुरू करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यानंतर जिल्ह्यात सखी सेंटर सुरू करण्याबाबत निर्णय घेतला आहे.

वन स्टॉप सखी सेंटर संकल्पना कशामुळे आली पुढेॽ
दहा वर्षांपूर्वी दिल्लीत झालेल्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणानंतर देश सुन्न झाला होता. यानंतर देशभरात सखी केंद्रासाठीचा निर्णय झालेला आहे.

या प्रकरणाची मिळणार मदत
सखी केंद्रातून पीडितेला निवारा, भोजन, वैद्यकीय सुविधा, गुन्हा नोंदीसाठी पोलिस कर्मचाऱ्याची मदत, मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन, न्यायालयीन लढाईसाठी विधिज्ञांची मदत या सुविधा २४ तास उपलब्ध करून दिल्या जातील.

आदर्श केंद्र चालवून पीडितांना मदत करणार
जिल्हा रुग्णालयाने सध्या तात्पुरती जागा उपलब्ध करून दिली आहे. भविष्यात चांगली जागा रुग्णालय उपलब्ध करून देणार आहे. सर्व भौतिक सुविधा उपलब्ध झाल्यानंतर आदर्श पद्धतीने हे सखी केंद्र चालवून पीडित महिलांना मदत करू.
एस. बी. सय्यद, अध्यक्ष, ग्रामीण विकास मंडळ, बनसारोळा.

बातम्या आणखी आहेत...