आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या भक्तीसाठी अनेक परंपरा आहेत. रामनवमीनिमित्त प्रभू रामचंद्र हे पालखीद्वारे प्रभू वैद्यनाथांची प्रदक्षिणा करून भेट घेतात. शनिवारी (१ एप्रिल) काळाराम मंदिराचा पालखी सोहळा वैद्यनाथ मंदिरात पोहोचल्यानंतर वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टने स्वागत करण्याऐवजी जागोजागी अडथळे आणल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागला. यानंतर संतप्त भाविकांनी मंदिर परिसरातच काही काळ ठिय्या आंदोलन केले.
महाशिवरात्र व दसऱ्यानिमित्त वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने प्रभू वैद्यनाथांचा पालखी सोहळा मानाची घराणे व भाविकांच्या सहभागाने आयोजित केला जातो. या पालखी प्रमाणे वैद्यनाथाच्या अनेक परंपरा आहेत. परळीत अनेक प्राचीन मंदिरे आहेत. यात प्रभू रामाच्या वर्णनाची वैशिष्ट्य असलेले गोराराम, सावळाराम व काळाराम ही तीन राम मंदिरे आहेत. रामनवमीनिमित्त या मंदिराच्या वेगवेगळ्या पालख्या निघतात. यातील गोराराम व सावळाराम मंदिराची पालखी गाव भागातून पुन्हा राम मंदिरात जातात, तर काळाराम मंदिराची पालखी जुन्या गाव भागातील मार्गावरून वैद्यनाथ मंदिरात जाते.
या वर्षी रामनवमीनिमीत्त काळाराम मंदिराची पालखी शनिवार, १ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता अंबेवेस येथून निघाल्यानंतर गणेशपार, सावळाराम मंदिरमार्गे वैद्यनाथ मंदिरात रात्री ९ वाजता पोहोचली. परंतु पालखीस दर्शन घेण्यासाठी व प्रदक्षिणा घालण्यासाठी प्रवेश मार्गच नव्हता. दर्शनानंतर बाहेर पडण्याच्या मार्गातून पालखी आत नेण्यात आली. सभामंडपातील नंदीच्या बाजूला बॅरिकेड्स लावल्याने पालखीला प्रदक्षिणेत अडथळा आला. नेमके याच वेळी मंदिर परिसरात पाणी टाकून फरशी गुळगुळीत करण्यात आल्याने पालखी वाहणाऱ्या मानकऱ्यांना कसरत करावी लागली. वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचा एकही पदाधिकारी पालखीच्या स्वागतासाठी उपस्थित नव्हता. यामुळे रात्री ९.३० वाजता पालखीसोबतच्या संतप्त भाविकांनी मंदिर परिसरात एक तास ठिय्या करत निषेध नोंदवला. याबाबत वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
काळाराम पालखीची शंभर वर्षांची परंपरा अंबेवेस येथील काळाराम मंदिरातून रामनवमीनिमीत्त दशमीच्या दिवशी जुन्या गावभागातून वैद्यनाथाच्या भेटीला निघणाऱ्या पालखीची १५० वर्षांची परंपरा आहे. धर्माधिकारी कुटुंबीय हा पालखी सोहळा आयोजित करत असते. प्रभू रामचंद्र वैद्यनाथाच्या भेटीला जात असल्याने भाविक मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात.
परंपरांना अडथळा आणण्याची भूमिका ^वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या सचिवपदी राजकीय पद असलेले राजेश देशमुख आहेत. गत पालिका निवडणुकीत काळाराम मंदिराचा पालखी सोहळा आयोजित करत असलेल्या बाजीराव धर्माधिकारी यांच्याकडून पराभव झाल्याने प्रभू वैद्यनाथाच्या संबंधी जुन्या परंपरांना अडथळे आणण्याचा खटाटोप ट्रस्टकडून केला जात आहे. - श्रीकांत मांडे, भाविक, परळी.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.