आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर आयोजित शिबिरात स्वतः रक्तदान करून रक्तदान महायज्ञाला सुरवात केली. त्यांनी केलेल्या आवाहनानुसार जिल्ह्यासह राज्यभरात ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी शिबिरे आयोजित करून उत्स्फूर्त रक्तदान केले. दरम्यान, आज सकाळपासूनच गोपीनाथ मुंडेंना अभिवादन करण्यासाठी कोरोनाचे सर्व नियम पाळून राज्यभरातून आलेल्या हजारो कार्यकर्त्यांनी समाधीचे दर्शन घेतले.
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आज गोपीनाथ गड विविध प्रकारच्या फुल माळांनी व विद्युत रोषणाईने सजला होता. यंदा कोरोनामुळे दरवर्षी सारखा मोठा कार्यक्रम नव्हता, तथापि सोशल डिस्टन्स व कोरोनाच्या नियमाचे पालन करून सर्वांना दर्शन घेता यावे अशी व्यवस्था करण्यात आली होती. आज सकाळपासूनच जिल्ह्यासह राज्यभरातील हजारो कार्यकर्त्यांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. अतिशय शिस्तबद्ध वातावरणात सर्वांनी लाडक्या लोकनेत्याला अभिवादन केले.
पंकजाताई रमल्या भजनात !
पंकजा मुंडे, डॉ.अमित पालवे, खासदार डॉ.प्रितम मुंडे, गौरव खाडे यांनी दुपारी गोपीनाथ गडावर येऊन मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी वारकरी संप्रदायातील भक्त मंडळीनी गडावर आयोजित केलेल्या सवाद्य भजनाच्या कार्यक्रमाने वातावरण भारावून गेले होते. पंकजा मुंडे हया स्वतः टाळ हातात घेत भजनात सहभागी झाल्या आणि थोडा वेळ तल्लीन होऊन गेल्या.
अन् स्वतः केले रक्तदान
जयंतीचे औचित्य साधून १२ ते १५ डिसेंबर दरम्यान सामाजिक उपयोगता लक्षात घेता रक्तदानाचे कार्यक्रम मोठया प्रमाणावर आयोजित करावेत असे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी केले होते. त्यानुसार सकाळी ९ ते ५ वा. दरम्यान गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व स्वा. रा. तीर्थ वैद्यकीय रुग्णालय अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने गोपीनाथ गडावर रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात पंकजाताई स्वतः सहभागी झाल्या, एवढेच नव्हे तर त्यांनी स्वतः रक्तदान केले, त्यांच्या समवेत माजी मंत्री महादेव जानकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त रक्तदान केले. दरम्यान, जिल्ह्यासह राज्यभरातही आज ठिक ठिकाणी रक्तदानाचे कार्यक्रम मोठया प्रमाणावर घेण्यात आले.
आज गोपीनाथ गडावर माजी मंत्री महादेव जानकर, खासदार भागवत कराड, खासदार सुजय विखे, आमदार रमेश कराड, आमदार मोनिका राजळे, आ. लक्ष्मण पवार, आ. राजेश पवार, आ. श्वेता महाले, आ. मेघना बोर्डीकर, आ. रत्नाकर गुट्टे, माजी आमदार गोविंदराव केंद्रे, फुलचंद कराड, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, रमेश आडसकर, देविदास राठोड भाऊराव देशमुख, जि. प. अध्यक्ष राहूल केंद्रे, संजय कौडगे अरूण मुंडे, प्रवीण घुगे आदींसह राज्याच्या विविध कानाकोपर्यातून कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने आले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.