आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाटोदा-मांजरसुंबा मार्गावर वैद्यकिन्हीजवळ टोलनाक्याचे काम पूर्णत्वास आले आहे. त्या ठिकाणी अद्याप टोलनाका सुरू नसल्याने पर्यायी रस्ता पावसामुळे निसरडा होत आहे. वारंवार दुचाकीचे अपघात घडत आहेत. त्यामुळे टोलनाका प्रत्यक्ष सुरू होईल तेव्हा होईल, परंतु तत्पूर्वी त्या ठिकाणी असलेला मुख्य रस्ता सुरू करून लोकांची गैरसोय थांबवा, अशी मागणी आ. सुरेश धस यांनी केली होती. यानंतर प्रशासनाने एक बाजू मोकळी करून वाहतूक सुरू केली आहे.
अहमदपूर-अहमदनगर या नव्यानेच होत असलेल्या महामार्गावर पाटोदा तालुक्यातील पाटोदा ते मांजरसुंबा मार्गावरील वैद्यकिन्हीनजीक गेल्या काही दिवसांपासून टोलनाक्याचे काम सुरू आहे. मुख्य रस्त्यावर हे काम होत असल्याने वाहनधारकांसाठी या कामाच्या बाजूने तात्पुरत्या स्वरूपाचा पर्यायी वळण रस्ता काढण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून या पर्यायी रस्त्यावर मोठाले खड्डे पडले असून मुरूममिश्रित खडी वर आल्याने दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. त्यातच आता पावसाळ्याचे दिवस असून थोड्या पावसानेही हा पर्यायी रस्ता निसरडा होत आहे. या ठिकाणी दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत आहे. तरी टोलनाका प्रत्यक्ष ज्या वेळी सुरू व्हायचा आहे त्या वेळी होईल मात्र वाहनधारकांसाठी गैरसोय टाळण्यासाठी टोलनाक्याच्या मुख्य रस्त्यावरील लेन खुल्या करून द्याव्यात, अशी मागणी आ. सुरेश धस यांनी करून यासंदर्भात अभियंता अशोक इंगळे यांच्याशी संपर्क करून त्यांना सूचना दिल्या होत्या.
गैरसोय थांबवणार आ. सुरेश धस यांच्या सूचनेनंतर तातडीने प्रशासकीय यंत्रणा हलली व आता टोलनाक्याच्या एका बाजूचे अडथळे हटवून एक लेन वाहनांसाठी खुली झाली आहे. यामुळे वाहनधारकांची पावसाळ्यात होणारी गैरसोय थांबणार आहे. यामुळे वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.