आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजलगाव:शिवसेनेच्या नूतन जिल्हाप्रमुखांना विरोध; शहरप्रमुखाला मारहाण; माजलगाव शहरप्रमुखाने ऑइल फेकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप

माजलगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • माजलगाव शहरप्रमुख सोळंकेंना मारहाण करताना जाधव समर्थक.

जिल्ह्यातील शिवसेनेत दाेन दिवसांपूर्वी खांदेपालट झाली. जिल्हाप्रमुख म्हणून माजलगावचे यापूर्वीचे तालुकाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांची निवड पक्षश्रेष्ठींनी केली. माजलगाव शहरप्रमुख धनंजय सोळंकेंनी या निवडीचा निषेध केला. गुरुवारी नूतन जिल्हाप्रमुख जाधव यांचे माजलगावात आगमन झाले. या वेळी त्यांच्या समर्थकांनी रॅली काढली. या रॅलीत शिरून निवडीचा निषेध करणाऱ्या शहरप्रमुख धनंजय सोळंकेंना जाधव समर्थकांनी बेदम मारहाण केली. दरम्यान, सोळंकेंनी जाधव यांच्या गाडीवर ऑइल फेकण्याचा प्रयत्न केला म्हणून समर्थकांनी त्यांना मारहाण केली असे जाधव यांनी म्हटले आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुखपदी निवड झाल्यानंतर अंतर्गत गटबाजी समोर आली. जाधव यांच्या निवडीला माजलगावातूनच शहरप्रमुखांनी विरोध करत त्यांच्या निवडीचा निषेध केला. दरम्यान, मुंबईला असलेले अप्पासाहेब जाधव हे गुरुवारी निवडीनंतर प्रथमच माजलगाव शहरात आले. त्यांच्या स्वागताची जंगी तयारी कार्यकर्त्यांनी केली होती. संभाजी महाराज चौक येथून वाहनांची रॅली निघणार असल्याने या ठिकाणी गर्दी झाली.

जाधव यांची गाडी रॅलीजवळ काही अंतरावर असताना शहरप्रमुख धनंजय सोळंके यांनी जाधव यांच्या गाडीवर ऑइल फेकले. त्यामुळे गाडीतून खाली उतरत जाधव यांच्या समर्थकांनी सोळंकेंवर हल्ला चढवला. जखमी अवस्थेत सोळंके यांना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. धनंजय सोळंके यांनी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर पोलिस ठाणे गाठले व मारहाण करणाऱ्यांविरोधात तक्रार दिली.

व्हिडिओ व्हायरल
शहरप्रमुख सोळंके यांना जाधव समर्थकांनी मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मारहाणीनंतर शहरात खळबळ उडाली, मात्र नियोजनाप्रमाणे जाधव समर्थकांनी शहरातून रॅली काढली.

बातम्या आणखी आहेत...