आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदली:दिव्यांग शिक्षकांची अग्निपरीक्षा

बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीप्रक्रियेत ‘शाळा’ करुन दिव्यांग, गंभीर आजारी असल्याचे सांगून प्रवर्ग एकमधून अर्ज करणाऱ्या ३३६ शिक्षकांच्या दिव्यांगत्वाबाबत प्राथमिक तपासणी बुधवारी जिल्हा परिषदेत पार पडली.यात दृ़ष्टीदोष, कर्णबधीर दिव्यंगत्व दिलेले सर्वच शिक्षक आणि अस्थिव्यंगचेही निम्मे शिक्षक अशा एकूण २०० पेक्षा अधिक जणांच्या दिव्यंगत्वाची आता लातूरच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून फेरतपासणी करण्यात येणार आहे.

शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया सध्या सुरु आहे. ऑनलाइन पद्धतीने या बदल्या केल्या जाणार आहेत. ग्रामविकास विभागाकडूनच या बदल्या होतात. दरम्यान, यासाठी विविध संवर्ग तयार करण्यात आलेले असून बदलीपात्र शिक्षकांनी आपापल्या संवर्गानुसार अर्ज करायचा असतो. यामध्ये, संवर्ग एक हा दिव्यांग, गंभीर आजारी असलेल्य शिक्षकांसाठीचा असतो. यामध्ये बदली होताना त्यांचे दिव्यंगत्व, आजारपण लक्षात घेता शिक्षकांच्या सोयीची बदली मिळते. मात्र, या सोयीचा गैरफायदा घेण्यासाठी उपयोग केला. संवर्ग एकमध्ये ३३६ जणांनी अर्ज केले होते.

मात्र, दिव्यांग व गंभीर आजारी असल्याचे सांगून अर्ज करणारे अनेक शिक्षक धडधाडकट आहेत. त्यांनी विविध जिल्ह्यांमधून दिव्यंगत्वाचे प्रमाणपत्र उपलब्ध केले आहेत. आजारी असल्याचे प्रमाणपत्रही अनेकांनी बनावट दिले. त्यामुळे खरे दिव्यांग शिक्षकांवर अन्याय होतो अशी तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती. यावर सीइओंनी दिव्यंगत्वाची तपासणी करण्याचा निर्णय घेतला होता.

आठ डॉक्टरांनी केली शिक्षकांची तपासणी
दरम्यान, तपासणीसाठी एकूण आठ टेबल करण्यात आले होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी आठ विशेषज्ञांची यासाठी नेमणूक केली होती. स्वत: साबळेही उपस्थित होते. प्रत्येक टेबलवर एका प्रकारच्या दिव्यंगत्वाची पडताळणी होत होती. कागदपत्र व प्राथमिक तपासणी केली गेली.

जिने चढताना खऱ्या दिव्यांगांचे झाले हाल
बनावट दिव्यांग शोधण्यासाठी राबवलेल्या या मोहिमेत खऱ्या दिव्यांगांचे हाल झाले. झेडपीची नव्या इमारतीचे जीने चढताना त्यांना त्रास सहन करावा लागला. सकाळीच उपस्थित रहावे लागल्याने अनेकांना पाणीही लवकर मिळाले नाही.

जिल्हा परिषदेला आले यात्रेचे स्वरुप
३३६ शिक्षकांच्या दिव्यांगत्वाची तपासणी होणार असल्यानेे झेडपीत मोठी गर्दी होती. झेडपीला जत्रेचे स्वरुप आले होते. तर, आवारातही चारचाकी वाहनांची मोठी गर्दी झाली होती. बहुतेक शिक्षक चारचाकीतून आले होते.

संशयित शिक्षकांची लातूरला फेरतपासणी
दिवसभरात प्राथमिक तपासणी केली गेली. आम्हाला जे संशयित वाटले असे २०० पेक्षा अधिक जणांना लातूर उपसंचालक कार्यालयाकडे फेरतपासणीसाठी पाठवले जाईल. कर्णबधिर, द़ृष्टीदोषाचे सर्वच तर अस्थिव्यंगचेही निम्म्याहून अधिक जण पाठवले जातील. - अजित पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. बीड

बातम्या आणखी आहेत...