आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाकाळातील लॉकडाऊनमध्ये चिमुकल्या मुलांकडून वाढलेला टीव्ही आणि मोबाइल वापर त्यांच्यातील स्वमग्नता वाढण्यास कारणीभूत ठरला आहे. जिल्ह्यात १०० पैकी ४ मुलांमध्ये स्वमग्नता आढळून येत असल्याची धक्कादायक माहिती शहरातील बालरोगतज्ज्ञ सचिन जेथलिया यांनी दिली.
२ एप्रिल हा जागतिक स्वमग्नता जागरूकता दिन (ऑटिझम डे) म्हणून पाळला जातो. यंदाच्या वर्षीची स्वमग्नता दिनाची थीम ही ‘इन्क्लुझिव्ह एज्युकेशन’ अशी आहे. म्हणजेच सामान्य शाळांमध्ये स्वमग्न मुलांना सामावून घेण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत जागरूकता केली जाणार आहे. अद्यापही पालकांना मुलांमधील स्वमग्नता हा एक आजार आहे, त्याच्यावर उपचार होऊ शकतात हे लवकर लक्षात येत नाही. जे पालक बालरोगज्ज्ञांकडे बालकांना नियमित लसीकरणासाठी घेऊन जातात, अशा वेळी त्यांच्या आरोग्य तपासणीदरम्यान बालरोगतज्ज्ञांना बालकांमधील स्वमग्नतेचा अंदाज येतो आणि त्यानंतर उपचार सुरू होतात. स्वमग्नता ही १८ महिने ते २ वर्षांच्या बालकांत सुरुवातीला आढळून येते. स्वमग्नता ही एक स्पेक्ट्रम डिसॉर्डर आहे. यात मुले आत्मकेंद्री बनतात. भवतालचे आकलन त्यांना लवकर होत नाही. त्यामुळे त्यांना समज कमी असते. प्रत्येक बाधित मूल हे वेगळे असते. त्यामुळे काहींमध्ये सौम्य, काहींमध्ये मध्यम तर काही मुलांमध्ये तीव्र स्वरूपाची लक्षणे आढळतात. हल्लीच्या काळात तर २ वर्षे वयाची छोटी मुलेही मोबाइल, टीव्हीच्या आहारी गेलीत. अनेक मुले मोबाइल दिल्याशिवाय किंवा टीव्ही लावून दिल्याशिवाय जेवत नाहीत, रडायला लागतात. टीव्ही, मोबाइल दिल्यावर मुले शांत होत असल्याने पालकही सुटकेचा नि:श्वास सोडतात. पण, याचा अतिवापरच मुलांना स्वमग्न करतो. विशेषत: कोरोनानंतर ही स्थिती अधिक चिंताजनक होत आहे. जिल्ह्यात १०० मुलांमागे ४ मुलांत स्वमग्नता आढळून येत आहे.
मुलांमधील स्वमग्नतेची लक्षणे
समोरच्या व्यक्तीच्या नजरेला नजर न देणे
दुसऱ्याकडे बघून स्मितहास्य न करणे
भाषेचा विकास लवकर न होणे, बोलता न येणे
दुसऱ्यांचे अनुकरण करता न येणे
संपूर्ण वस्तूऐवजी तिच्या एखाद्या भागाकडेच पाहत राहणे (उदा. गाडीची चाके)
फिरत्या वस्तूंकडे एकटक पाहणे
एकट्यानेच तोच तोच खेळ खेळत राहणे
एखादी वस्तू, गोष्ट न आवडल्यास रडून गोंधळ घालणे
मूल आत्मकेंद्रित होत जाणे
वेळीच निदान झाल्यास उपचार करणे होते शक्य
मुलांमधील स्वमग्नतेचे वेळीच निदान झाल्यास त्यांच्यावर उपचार शक्य आहेत. विविध प्रकारच्या थेरपी यासाठी आहेत. अॉटिझमबाधित मुले आता शाळा-महाविद्यालयांचे टप्पे पार करत आहेत. सामान्य मुलांमध्ये राहून ही मुले धिम्या गतीने का होईना पण त्यांचे अनुकरण करू शकतात. -डॉ. सचिन जेथलिया, बालरोगतज्ज्ञ, बीड
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.