आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गंभीर प्रकार:​​​​​​​ऑक्सिजन पुरवठा 15 मिनिटांसाठी बंद; 63 रुग्णांचा जीव लागला होता टांगणीला; माथेफिरूने केला होता पुरवठा करणारा कॉक बंद

बीड13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा बंद पडल्यानंतर नातेवाइकांची धावपळ

जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्रकल्प व सिलिंडरला नसलेल्या सुरक्षेने रुग्णांचा प्राण धोक्यात आला. अज्ञात व्यक्तीने शुक्रवारी रात्री साडेअकरा ते बारा वाजेदरम्यान वॉर्ड क्रमांक सात, आठ व नऊला होणारा ऑक्सिजन पुरवठ्याचा कॉक बंद करून खंडित केला. यामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतांच्या नातेवाइकांनी केला आहे. तर दुसरीकडे कॉक बंद केला त्यावेळी तीन वॉर्डमध्ये ६३ रुग्ण ऑक्सिजनवर होते. १५ मिनिटांसाठी हे रुग्ण अन् मृत्यू यांच्यात एका श्वासाचे अंतर उरले होते, वेळीच दुरुस्ती केल्याने मोठा अनर्थ टळला. दिव्य मराठीने स्टिंग करून येथील गलथान कारभार निदर्शनास आणून दिला होता, तरीही आरोग्य प्रशासनाने सजग न होता केलेला हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला आहे. जिल्हा रुग्णालयात सध्या शेकडो कोरोनाबाधित उपचाराखाली अाहेत. अनेकांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. आंतररुग्ण विभागाच्या मुख्य इमारतीतील ऑक्सिजन खाटा फुल्ल झाल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने परिचारिका वसतिगृहात ऑक्सिजन खाटा वाढवल्या. ऑक्सिजन तुटवड्याचा सामना करावा लागत असताना सध्या ऑक्सिजन हा विषय गंभीर झाला आहे.

रुग्णालयाचा वॉर्ड क्र. ७, ८ व ९ हे तीन वॉर्ड कोरोना संशयितांसाठी आहेत. येथे न्युमोनिया असलेले मात्र कोरोना चाचणी निगेटिव्ह असलेले रुग्ण आहेत. या तिन्ही वॉर्डला एअर ऑक्सिजन प्रकल्पातून ऑक्सिजन पुरवठ्याची सोय केलेली आहे. यासाठी वॉर्ड क्र. ७ जवळ जिन्याखाली सिलिंडर ठेऊन कॉक बसवलेले आहेत. या ठिकाणाहून या तिन्ही वॉर्डमध्ये जाणारा ऑक्सिजन पुरवठा नियंत्रित केला जातो. शुक्रवारी रात्री साडेअकरा ते बारा वाजेदरम्यान या कॉकला अज्ञात व्यक्तीने छेडछाड करून ऑक्सिजन सिलिंडर काढण्याचा प्रयत्न केला. यासाठी माथेफिरूने चक्क काॅक बंद केल्यामुळे तिन्ही वॉर्डचा ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला होता. दरम्यान, रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याची बाब काही परिचारिकांच्या लक्षात येताच त्यांनी आॅक्सिजन पुरवठ्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला याची माहिती दिली, नंतर वरिष्ठांनाही माहिती दिली. दरम्यान, काही मिनिटांत कॉक सुरू करून पुरवठा सुरळीत केला. मात्र यादरम्यान मोठी धावपळ उडाली.

‘दिव्य मराठी’ने मांडली होती भीतीची शक्यता, तरी दुर्लक्ष
शुक्रवार, दि. २३ एप्रिल २०२१ रोजीच्या अंकात दिव्य मराठीने ऑक्सिजन पुरवठ्याचे स्टिंग ऑपरेशन प्रसिद्ध करून भीतीची शक्यता मांडली होती. यात आॅक्सिजन टाक्यांची सुरक्षितता वाऱ्यावर असून कुणीही या आणि कॉक बंद करून जा अशी स्थिती असल्याचे वास्तव समोर आणले होते. मात्र, प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतलेली नसल्याचे या घटनेवरून समोर आले.

दोघांचा मृत्यू झाल्याचा आरोप
या घटनेनंतर वॉर्ड क्र. ७ मध्ये एक ३८ वर्षीय पुरुष आणि एक ७० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने रुग्ण दगावल्याचा आरोप करत दोषींवर कारवाईची मागणी नातेवाइकांनी केली आहे.

किती रुग्ण होते ऑक्सिजनवर
२५ रुग्ण वॉर्ड क्र. ७
२८ रुग्ण वॉर्ड क्र.८
१० रुग्ण वॉर्ड क्र.९

सीएस, एसीएस यांनी मध्यरात्री केली पुरवठ्याची पाहणी
ऑक्सिजन पुरवठा बंद केल्याची माहिती मिळताच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गिते, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी मध्यरात्री रुग्णालयात धाव घेत पाहणी केली. सर्व पुरवठा सुरळीत असल्याची या वेळी खात्री केली. शनिवारी सकाळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी रुग्णालयाला भेट देत आॅक्सिजन पुरवठा होणाऱ्या कॉकची पाहणी केली व सुरक्षिततेविषयी सूचना दिल्या.

शनिवारी सकाळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी रुग्णालयाला भेट देत आॅक्सिजन पुरवठा होणाऱ्या कॉकची पाहणी केली
शनिवारी सकाळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी रुग्णालयाला भेट देत आॅक्सिजन पुरवठा होणाऱ्या कॉकची पाहणी केली

रुग्णालय प्रशासनाने आरोप फेटाळले
ऑक्सिजन पुरवठा काही मिनिटांसाठी खंडित झाला होता हे खरे आहे. मात्र, तो तत्काळ सुरू केला. मृत्यू झालेला एक व्यक्ती हा ३८ वर्षीय असून त्याचा एचआरसिटी स्कोर २३ होता ताे व्हेंटिलेटरवर होता. घटना साडेअकरा वाजता घडली त्याचा मृत्यू पहाटे २ वाजता झाला, दुसरा मृत्यू ७० वर्षीय वृद्धाचा झाला. त्यांचा सिटी स्कोअर १९ होता ते बायपॅपवर होते. शिवाय कोमॉर्बिडीटीही होती. त्यांचा मृत्यू सकाळी ६ वाजता झाला. त्यामुळे ऑक्सिजनअभावी हे मृत्यू झाले असे म्हणता येणार नाही. नातेवाइकांनी अाराेप केले असले तरी लेखी तक्रार केलेली नाही. - डॉ. सुखदेव राठोड, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, बीड

या घटनेनंतर सुरक्षा वाढवली, आठ कर्मचारी नियुक्त
या घटनेनंतर आता ऑक्सिजन पुरवठ्याबाबतची सुरक्षा वाढवण्याच्या सूचना दिल्या असून वाढीव ८ कर्मचारी नियुक्त केले. सीसीटीव्हीची तपासणी करून हा प्रकार कुणी केला याचीही पडताळणी केली जाणार आहे अशी माहिती डॉ. राठोड यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

गांभीर्यहीन प्रशासन; पोलिसांत तक्रार नाही
थेट ऑक्सिजन पुरवठा बंद करण्याचा प्रकार होऊनही रुग्णालय प्रशासनाला याचे गांभीर्य नाही. याबाबत रुग्णालयाने शनिवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत पोलिसांत ऑक्सिजन बंद करणाऱ्याविरोधात साधी तक्रारही दिलेली नव्हती. आमच्याकडे कोणतीही तक्रार आलेली नाही, असे शहर ठाण्याचे पीआय रवी सानप यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...